स्ट्राँग रूममधील पत्रे विक्रीचा आरोप भुसावळ तहसीलदारांनी फेटाळला

निता लबडे म्हणाल्या ; सामाजिक कार्यकर्ते केदार सानपांकडून प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न


Bhusawal Tehsildar denies allegations of selling letters in strong room भुसावळ (15 मे 2025)  : भुसावळ तहसील कार्यालयाला लागून असलेल्या स्ट्राँग रूमवरील पत्रे बदलण्याचे कार्य अलीकडेच करण्यात आले मात्र नवीन पत्रे बदलल्यानंतर निघालेल्या जुन्या पत्र्यांची परस्पर विक्री झाल्याचा आरोप भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांनी प्रांत प्रशासन व जिल्हाधिकार्‍यांकडे केला होता. या आरोपाचे खंडण भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. सामाजिक कार्यकर्ते सानप यांच्याकडून केलेली तक्रार म्हणजे प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार असल्याची त्यांनी सांगत आरोपांचे खंडण केले.

लिलावाविनाच पत्रे विक्रीचा आरोप
तहसील कार्यालयातील निवडणूक स्ट्राँग रूमवरील पत्रे काही दिवसांपूर्वी बदलविण्यात आले मात्र जुने पत्रे विक्री करताना कुठलीही निविदा न काढता परस्पर पत्र्यांची विक्री करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांनी प्रांताधिकार्‍यांकडे केला होता. दोषींवर कारवाईची मागणी सानप यांनी केली होती तर तक्रारीनंतर पुन्हा ही पत्रे जुन्या तहसील कार्यालयात आणून ठेवण्यात आल्याचा दावाही सानप यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.

हा तर प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
तहसीलदार निता लबडे यांनी गुरुवारी रात्री नऊ वाजता तहसीलदार दालनात पत्रकार परिषद घेत सानप यांचा आरोप फेटाळला. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यक्रम अंतर्गत तहसील कार्यालयाची साफसफाई केली जात असून जुने साहित्य हटवले जात आहे. तहसीलदार कार्यालय आवारातील पत्रे जुन्या तहसीलमध्ये हलवण्यासाठी आपण निर्देश दिल्यानंतर पत्रे जुन्या तहसीलमध्ये एका वाहनातून हलवण्यात आली, पत्र्यांची विक्री करण्यात आल्याचा आरोप खोटा आहे. सानप यांच्या आरोपामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असून माध्यमांना चुकीची माहिती पुरवली जात असल्याचे त्या म्हणाल्या.

दहा लाखांचे साहित्य विक्रीचा अधिकार
तहसीलदारांना दहा लाखांपर्यंतचे ंसाहित्य विक्रीचा अधिकार असून लवकरच लिलाव प्रक्रिया बोलावून आपण साहित्य विक्री करणार आहोत शिवाय उद्यादेखील भंगार साहित्य तहसील कार्यालयातून जुन्या तहसीलमध्ये हलवण्यात येणार आहे. सानप यांनी अनेक प्रकरणात तक्रारी केल्या असून माहिती अधिकारातही अनेक अर्ज टाकले आहेत. वैयक्तिक द्वेषातून त्यांनी आरोप केल्याचे तहसीलदारांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !