गुन्हे शाखेला मिळाला एक क्लू अन् फेब्रुवारी महिन्यात लग्न समारंभातून 21 ग्रॅमची चैन चोरणार्‍याला जळगावात पडल्या बेड्या


Chain thief arrested by Jalgaon Crime Branch जळगाव (16 मे 2025) :  लग्न समारंभाच्या गर्दीतून एका महिलेच्या गळ्याला धारदार वस्तू टोचून 21 ग्रॅमची चोरी लांबवण्यात आली. जळगाव गुन्हे शाखेला क्लू मिळताच चैन चोरट्याला अटक करण्यात आली. अनिल विजय हरताडे (रा.लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल) असे आरोपीचे नाव आहे.

काय घडले जळगावात
6 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी परिसरातील एका लग्न समारंभात पुष्पाबाई जगन्नाथ न्याती (85) या रात्री 9 वाजेच्या सुमारास एका खोलीत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्याला काहीतरी टोचल्याचे सांगून 21 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकाने सुरू केला. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित अनिल हरताडे याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, पोलीस हवालदार अक्रम शेख आणि बाबासाहेब पाटील यांनी केली. तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !