पोस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत उकळले एक लाख वीस हजार : चाळीसगावातील हवालदाराविरोधात खंडणीचा गुन्हा

आमदार मंगेश चव्हाण आक्रमक : प्रशासनातील लाचखोरांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन


चाळीसगाव (19 मे 2025) : पोस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे तीन लाखांची मागणी करीत एक लाख 20 हजार रुपये उकळणार्‍या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण स्वतः पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून होते.

असे आहे नेमके प्रकरण
चाळीसगावातील स्वप्नील भाऊसाहेब राखुंडे (40, स्टेशन रोड, चाळीसगाव) यांचा कॉम्प्युटर-टायपिंग क्लास आहे. 18 मे रोजी सायंकाळी सहा वाजता दोन पोलिसांनी येत निखील राठोड कोण असल्याची विचारणा केली व त्याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याची सांगत अत्याचाराची ही घटना तुमच्या क्लासमध्ये घडल्याने तुमच्यासह भावाविरोधात गुन्हा दाखल होईल, अशी धमकी दिली तर एका पोलिसाने बाजूला घेत गुन्हा दाखल न होण्यासाठी मधला मार्ग काढू मात्र त्यासाठी पैसे लागतील, असे सांगितले.

तासाभरात दिले पैसे
राखुंडे यांनी तासाभरात मित्राकडून 50 हजार रुपये घेत कोर्टाजवळ संबंधित कर्मचार्‍याला रक्कम दिली मात्र या रकमेवर काम होणार नाही, अशी भीती घालण्यात आली. यावेळी तक्रारदाराने क्लासची जागा आईच्या नावावर असल्याने तिच्या अडचणी वाढायला नको म्हणून भीतीपोटी पैसे देण्याचे कबुल केले व पुन्हा मित्राकडून 50 हजार व स्वतःजवळील 20 हजार रुपये मिळून 70 हजारांची रक्कम राष्ट्रीय विद्यालयाजवळ दिली व त्यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनला बोलावून नोटीसवर सही घेण्यात आली. मित्रांनी पैसे उसने का घेतले ? याचे कारण विचारल्यावर त्यांना घडला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी ही बाब धमकावून गुन्हा नसताना पैसे उकळण्याची असल्याचे सांगितल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत कर्मचार्‍याविरोधात तक्रार नोंदवली.

लाचखोरांची आता खैर नाही : आमदार मंगेश चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, पोलीस कर्मचार्‍याच्या घरातून उकळलेले खंडणीचे एक लाख 20 हजार घर झडतीत जप्त करण्यात आले. ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच ‘कायद्याचे रक्षक जर भक्षक’ होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही.

दोषी पोलिसांच्या चौकशीची मागणी करणार
खंडणी प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहे. यात सहभागी सर्व पोलिसांची आयपीएस दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.

न्याय मिळत नसल्यास साधावा संपर्क
मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन-प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो, असेही आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !