हृदयरोगतज्ज्ञ डॉ.सचिन पाटील यांचा भव्य सत्कार
Grand felicitation of cardiologist Dr. Sachin Patil भुसावळ (21 मे 2025) : वैद्यकीय सेवेचा अभिमान – आमच्या फेकरीचा गौरव या जाज्वल्य भावनेतून फेकरी गावातील ग्रामस्थ आणि रंगमंच दीपनगर येथील कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील आघाडीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा रविवार, 18 मे रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गावकर्यांनी डॉ. सचिन पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आपल्या गावचा सुपूत्र म्हणून सन्मानित केले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी येऊन डॉ. सचिन पाटील यांचा सत्कार केला. अध्यक्षस्थानी उपमुख्य अभियंता संतोष वकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून फेकरी गावाच्या सरपंच चेतना भिरूड, प्रभाकर सोनवणे, उपमुख्य औद्यगिक अधिकारी मुकेश मेश्राम, डॉ.जयंत पाटील, डॉ.विकास बामणे, अधीक्षक अभियंता कांबळे, ढोक, अतुल पवार साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय सेवेतील अपूर्व योगदान
कोल्हापूर येथील सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. पाटील यांनी आजवर 50 हजाराहून अधिक अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. 12 लाखांहून अधिक रुग्णांची वैद्यकीय तपासणी करीत त्यांनी हजारो कुटुंबांना जीवनदान दिले आहे. कोरोना काळात 24 तास कार्यरत असणार्या दवाखान्यात त्यांनी 9,975 रुग्णांवर उपचार करून फक्त 13 रुग्ण मृत्युमुखी पडले, ही त्याच्या वैद्यकीय कौशल्याची आणि सेवाभावाची साक्ष आहे.
सामाजिक बांधिलकीचे दर्शन
फक्त वैद्यकीय नव्हे, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही डॉ. पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे. दृष्टीहीन मुलांसाठी विशेष सुविधा, शैक्षणिक जबाबदार्या आणि कला-विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. इस्लामपूर येथे अंतिम टप्प्यात असलेले 200-250 खाटांचे चारिटेबल रुग्णालय गरिबांसाठी मोफत आरोग्यसेवा देणार आहे.
गावकर्यांचा भावनिक सहभाग
या कार्यक्रमात माजी सरपंच प्रभाकर सोनवणे यांनी आपल्या पत्नीच्या उपचारांचा अनुभव सांगताना भावनिक होत, फक्त 16 हजारांत जीव वाचवणारा डॉक्टर म्हणजे आमचे सचिन दादा, असे उद्गार काढले. बालमित्र, नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी अभिमानाने डॉ. पाटील यांचा सत्कार केला.
गावाच्या सुपुत्राचा सन्मान
हा सोहळा म्हणजे केवळ वैद्यकीय क्षेत्रातील यशाचा गौरव नव्हता, तर फेकरी गावाच्या सुपुत्राने गाठलेल्या उंचीचा सन्मान होता. सचिन सर म्हणजे माणुसकीचा खरा चेहरा, असे विकास बामणे याचे मत पडले. त्यांच्या कार्यामुळे फेकरी गावाचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहोचत आहे. गावकर्यांच्या मनात अभिमान आणि आदराचे स्थान निर्माण करणार्या या सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले.या प्रसंगी डॉ सचिन पाटील यांचे बालपणीचे मित्र श्री किरण कवठे, श्री ज्ञानेश्वर बोरोले, ईश्वर चौधरी व त्याचे काका श्री राजेंद्र पाटील आणि भाऊ श्री स्वप्नील पाटील व मिलिंद पाटील, तसेच निभोरा गावचे ग्रापंचयत सदस्य उल्हास बोरोले , श्री प्रशांत निकम, गजू झोपे, संजय भिरूड, अशोक बोरोले, निलेश पाटील, लीलाधर बोरोले किरण बोरोले, श्रावण बोरोले, योगेश पाटील, गिरीष पाटील,विनोद भिरूड,शुभम पाटील याचे सहकार्य लाभले. व सूत्रसंचालन श्री अतुल चौधरी यांनी केले यावेळी परिसरातील नागरिक व महिलां कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते.