तुमच्याकडील पाचशे रुपयांची नोट बनावट आहे का ? मुक्ताईनगरात बँकेच्या भरण्यात आढळल्या बनावट नोटा !
Fake notes found in bank deposit in Muktai Nagar मुक्ताईनगर (21 मे 2025) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यापार्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या तब्बल सात बनावट नोटा निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बँक व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, या परिसरात बनावटा नोटा चलनात आणणारी टोळी तर कार्यरत नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
काय घडले नेमके
शहरातील बोदवड रोडवरील स्टेट बैंक ऑफ इंडियांच्या शाखेत वीटभट्टी व्यावसायीक दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक लाख 20 हजार रुपये भरणा करण्यासाठी आले होते मात्र त्या व्यापार्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या सात नोटा बनावट आढळल्या.

रोखपालाने ही बाब तत्काळ स्टेट बँक व्यवस्थापकास सांगितली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यापार्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे दुसर्या व्यवहारातून ही रक्कम आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरणे देण्यात आले.
मुक्ताईनगर शाखा स्टेट बँकेचे व्यवस्थापक कार्तिक दहीकर यांनी मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. यावरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बनावट नोटा ताब्यात बाळगणे व वापरात आणण्याचा प्रयत्न करणे यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत.




