जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : चाळीसगावातील घरफोडी प्रकरणी सोनगीरच्या संशयीताला अटक
युपीसह धुळ्यातील संशयीतांचा कसून शोध : चार जिल्ह्यात आरोपींनी केर्या चोर्या

Jalgaon Crime Branch’s performance : Suspect from Songir arrested in Chalisgaon burglary case चाळीसगाव (23 मे 2025) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगावातील घरफोडीची उकल करीत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन, चोरीचा मुद्देमालही जप्त केला.
चार संशयीत निष्पन्न
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात दिवसाढवळ्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. या माहितीच्या आधारे एकूण चार संशयित आरोपी निष्पन्न केले व कैलास चिंतामण मोरे (रा.मोहाडी, जि.धुळे), राहुल प्रभाकर अहिरे (रा. सोनगीर, जि. धुळे), जयप्रकाश यादव (रा. उत्तरप्रदेश), वीरेन ठाकूर (रा. उत्तरप्रदेश) हे निष्पन्न झाले.
सोनगीर येथील राहुल प्रभाकर अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हा करताना वापरलेली कार आणि चोरीचा काही मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. राहुल अहिरे याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
चार जिल्ह्यांमध्ये केल्या चोर्या
अटकेतील राहुल अहिरेच्या सखोल चौकशीत त्याने सांगितले की, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी धुळे, जळगाव, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने अनेक घरफोडीचे गुन्हे केले आहेत. ही एक संघटीत गुन्हेगारी टोळी आहे. आरोपी चोरी करण्यापूर्वी घरांची रेकी करीत व घरात कोणी नसल्याची खात्री करूनच चोरी करीत. त्यानंतर वाहनाने पळ काढत असत. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते वारंवार त्यांचे लोकेशन आणि वाहने बदलत होते.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेखर डोमाळे, हेडकॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस नाईक दीपक माळी, पोलीस शिपाई महेश पाटील, भूषण शेलार, सागर पाटील तसेच चालक हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी आणि भरत पाटील यांनी केली.
दरम्यान, टोळीच्या उर्वरित तीन सदस्यांचा शोध सध्या सुरू असून, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पथके रवाना केली आहेत.
