शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : खड्ड्यात लपवलेला 50 लाखांचा गांजा जप्त

Shirpur taluka police take major action: Ganja worth Rs 50 lakhs hidden in a pit seized शिरपूर (24 मे 2025) : शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गांजाबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धडक देत जमिनीत खड्डा करून लपवलेला तब्बल 50 लाख 50 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत सुरेश सुबाराम पावरा (कनगई, ता.शिरपूर) याने कनगई शिवारातील वनजमिनीत खड्डा खोदून त्यात सुका गांजा लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी वन जमिनीवर उत्तरेस नाल्यालगत जनावरांना लागणारा सुका चारा (कडबा) रचलेला दिसला व त्याखाली एक खड्डा खोदून त्यामध्ये 50 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 505 किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर पथक येताच संशयीत पसार झाला. आरोपीविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार सागर ठाकुर, हवालदार चत्तरसिंग खसावद, हवालदार राजू ढिसले, कॉन्स्टेबल कृष्णा पावरा, चालक मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.
