जळगावात महसूल कर्मचार्याला कंटेनरने चिरडले
Revenue employee crushed by container in Jalgaon जळगाव (1 जून 2025) : शहरात अपघातांची मालिका कायम आहे. रस्ता ओलांडणार्या महसूल कर्मचार्याला अज्ञात कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विशाल रमेश सोनार (शिव कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक वाहनासह पसार झाला.
स्थानिकांची गर्दी
अपघातानंतर शिवकॉलनी येथील स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की, विशाल सोनार यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक पोलीस कर्मचारी देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
विशाल सोनार हे पाळधीकडून जळगाव शहराकडे जाणार्या रोडवर शिवकॉलनीजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी वेगाने आलेल्या एका अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. हा अपघात रविवार, 1 जून रोजी दुपारी अडीच वाजता घडल्यानंतर कंटेनर चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.
मयत विशाल सोनार यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र आढळून आले. त्यावरून ते महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ मृतदेहाचा पंचनामा केला आणि एका खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मयत विशाल सोनार यांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून पसार कंटेनर चालकाचा शोध सुरू आहे.