भुसावळून पुण्याला निघालेली संगीतम ट्रॅव्हल्सची बस उलटली : प्रवासी जखमी
Sangeet Travels bus heading from Bhusawal to Pune overturns : Passengers injured जामनेर (2 जून 2025) : संगीतम ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला जामनेर तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात 15 हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. भरधाव वेगाने बस जात असताना चालकाचे खराब रस्त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा अपघात गंगापुरी ते गारखेडे (ता. जामनेर) या गावादरम्यान रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. जखमींमध्ये तीन-चार बालकांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचल्या.
बेबाबाई घाडे (75), साहील घाडे (8, दोन्ही रा. खिरोदा), ललिता इंगळे (40), दिशा इंगळे (8, दोन्ही रा. बन्हाणपूर), योगेश चौधरी (34) आणि रणजित राजपूत (30, दोन्ही रा. भुसावळ) या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. प्रवीण पाटील व परिचारिकांनी जखमींवर उपचार केले. या बसमधील अन्य 15 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बस उलटल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ट्रॅफिक जाम झाले आणि गावातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले. काही जखमी प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर इतरांना जामनेर व जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.