अमळनेर तालुक्यात दोन चिमुकल्यांचा तापी पात्रात बुडून मृत्यू
Two children drown in a hot water tank in Amalner taluka अमळनेर (3 जून 2025) : तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील निम गावाजवळ सोमवार, 2 जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण निम गावात शोककळा पसरली. चेतन अरुण सुतार (9) व हरीश बाळू पाटील (12) अशी मृतांची नावे आहेत.
सोमवारी सायंकाळी ही मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असता चेतन सुतारचा मृतदेह तापी नदीत तरंगताना आढळला.
शोधमोहीम सुरू असताना दुसरा मुलगा हरीश बाळू पाटील याचा मृतदेह मात्र सोमवारी सापडला नाही मात्र मंगळवारी सकाळी हरीशचा मृतदेहही नदीत आढळला. दोन्ही मुलांचे मृतदेह तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुले नदीकाठी कपडे काढून पोहण्यासाठी उतरली होती. पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नसावा किंवा अचानक आलेल्या प्रवाहामुळे ते खोल पाण्यात ओढले गेले असावेत.
मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, तसेच फिरोज बागवान, संजय पाटील आणि अगोने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला .