कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकर्याने टोकाचे पाऊल
Farmers take extreme measures as debt piles up जळगाव (3 जून 2025) : कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना सोमवार, 2 जून रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडलीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश अशोक पाटील (40, रा.वडली, ता.जळगाव) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
गणेश पाटील हे शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यावर सोसायटी व बँकेचे कर्ज होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडता येईल या विवंचनेत असतानाच त्यांनी सोमवारी दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेतला.
त्यांची पत्नी साडे चार वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर घटना उघड झाली. ग्रामस्थांच्या मदतीने गणेश पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे वडली गावावर शोककळा पसरली. शेतकर्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.