कृषी घोटाळ्याचे पुरावे देत दमानिया म्हणाल्या : आता धनंजय मुंडे वाचत नाहीत !

Giving evidence of the agricultural scam, Damania said : Now Dhananjay Munde is not reading! मुंबई (4 जून 2025) : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे एसीबी अर्थात अँटी करप्शन ब्युरोला दिले आहे. आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा ठाम दावाही केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एसीबीने त्यांना या आरोपांचे पुरावे देण्याचा समन्स बजावला होता. त्यानुसार, दमानिया यांनी बुधवारी अँटी करप्शन ब्यूरोच्या येथील कार्यालयाला भेट देऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा दावा केला.

अंजली दमानिया म्हणाल्या, मी आज कृषी घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज एसीबीला दिले. आत्ताच्या घटकेला मी एवढेच सांगेन की, अँटी करप्शन ब्यूरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली, तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत. पण त्यांच्यावर शासकीय किंवा प्रशासनाची मेहेरबानी झाली तर मला माहिती नाही. पण आज जी काही माहिती मी दिली, ती अत्यंत खरी असून, त्यात कोणतीही शंका नाही. मी दिलेले दस्तऐवज 3 कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी 2 कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्यांनी पदावर असताना एवढा मोठा कृषी घोटाळा केला. त्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटींपैकी 161 कोटी खाल्ले गेलेत. हा घोटाळा नाही तर काय आहे? असे त्या म्हणाल्या.
जालिंदर सुपेकरांमुळेच वाल्मीक कराडची तुरुंगात सरबराई
अंजली दमानिया यांनी यावेळी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी अडचणीत सापडलेल्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनीही आपल्यावरील आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला होता. त्यांनी 4 मार्च रोजी माझ्याविरोधात मानहाणीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण आजतागायत त्यांच्याकडून मला कोणतीही नोटीस आली नाही. आता जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनीही मला मानहानीची नोटीस पाठवण्याचा इशारा दिला पण आजपर्यंत त्यांचीही नोटीस मिळाली नाही.
