‘नन्हे फरिश्ते’ ऑपरेशन अंतर्गत घरातून पळून जाणार्या अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीकडे केले सुपूर्द
भुसावळ (9 जून 2025) : मध्य रेल्वेच्या ‘नन्हे फरिश्ते’ ऑपरेशन अंतर्गत भुसावळ स्थानकावर रविवार, 8 जून रोजी घरातून पळून जाणार्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन जळगाव येथे बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. घरात कुणालाही काहीही न सांगता मुलगी पळून जात होती.
अशी उघडकीस आली घटना
रविवारी दुपारी 12.05 वाजता खंडवा स्थानकावरून 12533 अप पुष्पक एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असलेले तिकीट निरीक्षक के.के.मालपाणी यांना एस-4 डब्यात एक संशयित अल्पवयीन मुलगी दिसली. मालपाणी यांनी चौकशी केली असता, तिने समाधानकारक उत्तर दिले नाही, तिच्याकडे तिकीट किंवा पास नसल्याचे सांगितले.
गाडी भुसावळ स्थानकावर पोहोचल्यानंतर तिकीट निरीक्षक मालपाणी यांनी त्या अल्पवयीन मुलीला आरपीएफ ठाण्यात आणले. निरीक्षक आरपी मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीच्या देखरेखीत,एएसआय एस. जे. दुबे यांच्यासमोर आरपीएफ महिला हवालदार एस. एम. वांदे यांनी तिची चौकशी केली. तिने तिचे नाव अंशिका कुमारी गंगाराम निषाद (वय 17, रा. महुईया, जिल्हा अलाहाबाद) असे सांगितले.

आरपीएफने मुलीची सखोल चौकशी केली असता अंशिकाने सांगितले की, ती घरात कोणालाही न सांगता आपल्या नातेवाईकांकडे पळून जात होती. पालकांचा मोबाईल नंबर विचारला असता तिला तो माहीत नसल्याचे तिने सांगितले. यावेळी त्या अल्पवयीन मुलीची येथील ट्रॉमा केअरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अंशिका कुमारीला सुखरूपपणे जळगाव येथील बाल कल्याण समिती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.




