चाळीसगाव तालुक्यातील तरुणीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाने बनावट पत्र देत फसवणूक
चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
न्युज डेस्क । चाळीसगाव (12 जून 2025) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे रुजू पत्र (जॉइनिंग लेटर) देऊन मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव सायगाव येथील एका भागातील तरूणीला मुंबई येथील मंत्रालयात क्लर्कच्या नोकरीचे आमिष दाखवून बनावट जॉइनिंग पत्र देण्यात आले. हे पत्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर व त्यांच्या सहीसह देण्यात आल्याने प्रथमदर्शनी ते खरे वाटलेपरंतु मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकृत नियमांनुसार रुजू पत्रावर मुख्यमंत्री नव्हे तर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते. हे नातेवाईकांनी लक्षात आणून दिल्यानंतर तरुणीने मुख्य संशयित आरोपी सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता, त्याने खळबळजनक माहिती दिली.
जॉइनिंग लेटर मिळण्याबाबतचा तगादा वाढल्याने त्याने खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने इंटरनेटवरून सीएम ऑफीस लेटर असे सर्च केले आणि मिळालेल्या लेटरपॅडवर बनावट मजकूर टाईप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नकली सही टाकून रुजू पत्र तयार केल्याची कबुली दिली.
या संपूर्ण प्रकारात तिसरा संशयित तुषार उर्फ रोहीत मधुकर बेलदार याने देखील सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.




