रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी : जळगावातील बाल गुन्हेगार ताब्यात

Mobile phone theft by hitting railway passengers on the hands with a stick : Juvenile offender in Jalgaon arrested भुसावळ (16 जून 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात दरवाजात मोबाईल पाहणार्या प्रवाशांच्या हाताला काठी मारून मोबाईल पडल्यावर घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने याबाबत पाळत ठेवत दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. संशयीतांकडून 65 हजारांच्या आयफोनसह हा मोबाईल जप्त केले आहेत.
आयफोनसह अन्य सहा मोबाईल जप्त
जळगाव रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करत ‘फटका’ प्रकरणात दोन सराईत बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. चालत्या गाडीतून मोबाईल हिसकावण्याच्या प्रकारात हे दोघे सहभागी होते. 12 जून रोजी अमृतसर-बांद्रा एक्स्प्रेस (गाडी 11058) मध्ये प्रवास करत असलेल्या दानिश आबीद खान या प्रवाशाला दोघांनी लाकडी काठीने मारहाण करत त्याचा 65 हजार रुपये किंमतीचा आयफोन हिसकावण्यात आला होता. या घटनेत प्रवासी जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक आयुक्त, निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.
सीसीटीव्हीने टीपल्या हालचाली
जळगाव आउटर परिसरात सीसीटीएनएस रेकॉर्डवरून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर संशयित दोघांना पकडण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले दोघे जळगावमधील असून त्यांचे वय अनुक्रमे 15 व 16 वर्षे आहे. यापूर्वीही ते अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकले होते. त्यांच्याकडून मारहाणीमध्ये वापरलेली लाकडी काठी, चोरी गेलेला आयफोन तसेच आणखी सहा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. हे फोनही चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे. संपूर्ण मुद्देमाल आणि दोन्ही संशयीत मुलांना पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे. रेल्वे पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.
