कोंगानगर वीज अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू : आमदार मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नांना वारसांना आठ लाखांची मदत

Three of a family die in Konganagar electrical accident : MLA Mangesh Chavan’s efforts lead to Rs 8 lakh assistance to heirs चाळीसगाव (19 जून 2025) : वाघले कोंगानगर परिसरात शेतात कापूस लावणीचे काम सुरू असताना आकाशातून कोसळलेल्या वीजेच्या जोरदार तडाख्याने एकाच कुटुंबातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची अत्यंत दुर्दैवी व काळजाला हादरवणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
या अपघातात दशरथ उदल पवार (24), लखन दिलीप पवार (14), व समाधान प्रकाश राठोड (09) या तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत समाधान प्रकाश राठोड हा देखील मयत दशरथ राठोड याचा शालक होता, 15 दिवसांपूर्वीच दशरथ चा विवाह मयत समाधान याच्या मोठ्या बहिणीशी झाला होता.
घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे सांत्वन करत शासकीय यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तालुका प्रशासनाशी समन्वय साधून पंचनामे व इतर प्रशासकीय प्रक्रिया झपाट्याने पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसांत चाळीसगाव तालुक्यातील दोघा मृत व्यक्तींचे – 1. लखन दिलीप पवार, 2. दशरथ उदल पवार यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख प्रमाणे एकूण 8 लाख सानुग्रह अनुदान ऊइढ प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात आले.
तिसरा मृत युवक समाधान राठोड हा कन्नड तालुक्यातील रहिवासी असल्याने त्याच्या वारसांना तातडीने मदत मिळण्यासाठी कन्नड तहसीलदार यांच्यामार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी दाखवलेली संवेदनशीलता, तत्परता व प्रशासनातील गतिमानता ही कौतुकास्पद असून, हे त्यांच्या जनतेविषयी असलेल्या बांधिलकीचे उदाहरण म्हणता येईल.
मयतांच्या कुटुंबियांना एकटे पडू देणार नाही : आमदार मंगेश चव्हाण
कोंगानगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे जो दुखाचा डोंगर पवार कुटुंबावर कोसळला आहे त्याचा विचार देखील करणे शक्य नाही. त्यांचे झालेले नुकसान कधीच न भरून येणारे जरी असले तरी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कुटुंबाला 8 लाखांची आर्थिक मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून देखील पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी राहील, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.
