जळगावातील हिट अॅण्ड रनचा थरार : महिलेचा मृत्यू

Hit and run incident in Jalgaon : Woman dies जळगाव (21 जून 2025) : जळगावात भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक दिल्याची घटना तीन दिवसांपूर्वी अर्थात गुरुवारी घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वंदना सुनील गुजराथी (49, रा. पार्वतीनगर) या महिलेचा शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोंटू शिवपाल सैनी (26, रा.वाघ नगर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले जळगावात
वाघ नगरमधील मोंटू सैनी हा तरुण गुरुवारी रात्री महाबळ परिसरातून कार (क्र. एमएच 19, ईपी 1694) घेऊन भरधाव वेगाने जात होता. यामध्ये वाहनचालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर काही अंतरावर कारचालकाने वंदना गुजराथी या महिलेला धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, सैनी याला नागरिकांनी पकडून रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातप्रकरणी मोंटू सैनी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महाबळ परिसरात भरधाव कारचा एवढा थरार होता की, तिचा वेग व वाहनांना उडवत जाण्याचे चित्र पाहून परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. ही भरधाव कार येत असल्याचे दिसताच एका दुचाकीस्वाराने बाजूला उडी घेतली त्यामुळे तो बालंबाल बचावला.
दरम्यान, चालक एकापाठोपाठ अनेक वाहनांना उडवत गेला व अनेक जण जखमी झाले. त्यावेळचा थरार पाहून जखमी बाजूला गेले व नंतर रुग्णालयात निघून गेले. मात्र पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणीही न आल्याने अद्याप जखमींची एकूण संख्या स्पष्ट झालेली नाही.
