दारूची बाटली न दिल्याच्या राग : साकेगावातील वरुण हॉटेलची तोडफोड करीत मॅनेजरवर हल्ला
आरोपींनी गल्ल्यातून रोकड लांबवली : हॉटेलचे दिड लाखांचे नुकसान

Angry over not being given a bottle of liquor: Varun Hotel in Sakegaon vandalized and attacked the manager भुसावळ (25 जून 2025) : हॉटेलमध्ये दारूची बाटली न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना साकेगाव येथील वरुण हॉटेलमध्ये घडली. आरोपींनी यावेळी गल्ल्यातून 25 हजार रुपये लूटून नेले. ही घटना सोमवार, 23 जून रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
महामार्गावरील साकेगावजवळील वरुण हॉटेलचे मॅनेजर सुमित सुभाष इंगळे (33, रा.न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत कुणाल अहिरे याला रविवार, 22 जून रोजी दारूची बाटली दिली नाही, याचा राग मनात धरून कुणाल अहिरे याने त्याचे साथीदार सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी व अन्य 8 ते 10 अनोळखी इसमांना सोबत घेऊन हॉटेलवर हल्ला केला.

संशयीत कुणाल अहिरे याने सुमित इंगळे यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच अन्य संशयीतांनी हॉटेलमधील कर्मचार्यांना शिवीगाळ करत हॉटेलचे सुमारे 1 ते 1.50 लाख रुपयांचे नुकसान केले. एवढेच नव्हे, तर हॉटेलमधील गल्ल्यातून सुमारे 20 ते 25 हजार रुपये बळजबरीने काढून नेले व जाताना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर मशीनही संशयीतांनी सोबत घेऊन पळ काढला. सुमित इंगळे यांचा जबाब जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमधून सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांनी नोंदवला. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहेत.
