रेल्वे सुरक्षा बलाकडून वाशिमच्या मोबाईल चोरट्याला अटक : लाखाचे दोन मोबाईल जप्त

भुसावळ (6 जुलै 2025) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत भुसावळच्या आरपीएफ टीमने एक महत्त्वपूर्ण कारवाई करत संशयावरून एकास अटक केली. त्याच्याकडून 97 हजार रुपयांचे दोन मोबाईल पथकाने जप्त केले. ही कारवाई भुसावळ विभागातील मलकापूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
गस्तीदरम्यान यंत्रणेची कारवाई
आरपीएफ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी मध्यरात्री 12.15 वाजता मलकापूर स्टेशनच्या दक्षिण भागातील पार्किंग परिसरात गस्त घालणार्या आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या स्टाफने एका संशयास्पद व्यक्तीला रेल्वे स्थानकावर फिरताना पाहिले. त्यास थांबवून विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे त्याला तात्काळ मलकापूर आरपीएफ ठाण्यात चौकशीसाठी आणले, तेथे त्याची आरपीएफ अधिकार्यांनी कसून चौकशी केली,
तपासादरम्यान संबंधित व्यक्तीने आपले नाव निखील केशव खिरैया (37, रा.शिक्षक कॉलनी, वाशिम) असे सांगितले. दोन पंचांच्या समक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात दोन मोबाईल मिळून आले. एका मोबाईलची किंमत सुमारे 82 हजार रूपये आहे. चौकशीअंती संशयीताने कबूल केले की,दि. 19 जून रोजी भुसावळ स्टेशनवर उभ्या असलेल्या पठाणकोट एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा तो मोबाईल चोरी केला होता. तसेच, त्याने आणखी एक सुमारे 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल सुद्धा त्या ट्रेनमधून चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही मोबाईलची एकूण अंदाजित किंमत 97 हजार आहे.
चोरीचा गुन्हा कबूल केल्यावर संशयीतास आरपीएफने पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले. याप्रकरणी आधीच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई आरपीएफ टीम भुसावळचे महेंद्र कुशवाह, अकोल्याचे पंकज गवई, संतोष शेट्ठे आदींनी केली.
