सोशल मिडीयातून मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा : माथेफिरूवर कारवाईसाठी भाजपा आक्रमक


भुसावळ (6 जुलै 2025)  भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी शनिवार, 5 जुलै रोजी फेसबुक लाईव्ह करून साकेगावातील रहिवासी व डोंबिवलीस्थित भुषण पाटील नामक मनोविकृताने गरळ ओकून अवमान जनक भाषा वापरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भाजपा पदाधिकारी संतप्त झाले आहेत. दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी बाजारपेठ पोलिस प्रशासनाकडे निवेदन देवून करण्यात आली तसेच घडल्या प्रकाराचा निषेधही करण्यात आला.

महामानवाविषयी वापरले अपशब्द
भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवेदनानुसार, संशयीत भूषण पाटील नामक व्यक्तीने 5 रोजी फेसबुक लाईव्ह करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग केला शिवाय मंत्री संजय सावकारे यांच्याविषयीदेखील जातीवाचक अपमानजनक अपशब्द वापरून त्यांची बदनामी केली. संबंधित मनोविकृताचा शोध घेवून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देताना भाजपा शहराध्यक्ष किरण कोलते व संदीप सुरवाडे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी यांच्यासह माजी नगरसेवक पिंटू कोठारी, गिरीश महाजन, देवा वाणी, राजेंद्र आवटे, राहुल तायडे व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोरगाव लेवा पाटील शाखेतर्फे मनोविकृताचा निषेध
भुसावळातील भोरगाव लेवापाटील शाखेतर्फे मनोविकृताने केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. सुहास चौधरी व इतर संचालकांनी बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन दिले. भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष सुहास चौधरी, परीक्षीत बर्‍हाटे, हरीष फालक, शरद फेगडे, आर.जी चौधरी, आरती चौधरी, कावेरी चौधरी, संध्या वराडे, मंगला पाटील हजर होते तसेच लेवा समाजातील पुरूषोत्तम नारखेडे, देवा वाणी, गिरीश महाजन, जयश्री चौधरी, निळू भारंबे आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !