यावल तालुक्यात हॉटेल व्यावसायीकावर गोळीबार : अज्ञाताविरोधात गुन्हा
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
Hotelier shot dead in Yaval taluka : Crime against unknown यावल (11 जुलै 2025) : यावल तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्याजवळ बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्या होत्या. गुरुवारी घडलेल्या या घटने प्रकरणी यावल पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोळीबाराने खळबळ
दुचाकीवर आलेल्या दोघांचा शोध पोलिस घेत आहे तर घटनास्थळी रात्रीच जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक हे पाहण्यासाठी दाखल झाले. शुक्रवारी डीवायएसपी यांनी पोलिस निरीक्षकांसह धानोरा किनगाव सह मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व पाहणी केली. या घटनेतील जखमी हॉटेल मालकाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

काय घडले चिंचोलीत
चिंचोली, ता.यावल येथे आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे. या हॉटेलवर गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवर दोघे आले. त्यापैकी एक जण दुचाकी खाली उतरून हॉटेल बंद करून कारद्वारे किनगावकडे निघत असलेले हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (40, रा.पुनगाव, ता.चोपडा, हल्ली मुक्काम चंदू अण्णा नगर जळगाव), हे त्यांच्या कार (क्रमांक एम.एच. 19 सी.एफ. 3353) मध्ये होते व त्यांच्या बाजूला त्यांचे मित्र रतन रमेश वानखेडे (42, रा.किनगाव खुर्द) होते. दुचाकीच्या खाली उतरून त्यांच्या कारजवळ एक अनोळखी तरुण आला व त्याने सांगितले की, मला बियर पाहिजे आहे. त्याला सांगितले की, हॉटेल बंद आहे. तुला जर बियर पाहिजे असेल तर किनगाव येथे जा.
या बोलण्याच्या रागातून त्या अनोळखी इसमाने आपल्याजवळून कट्टा काढत प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक त्याच्या छातीत लागली तर एक त्याच्या उजव्या खांद्याजवळ लागली आणि गोळी झाडून दोघेही किनगावच्या दिशेने दुचाकीद्वारे पसार झाले.
जखमी अवस्थेत बाविस्कर यांना जळगावात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते व त्यांनी पाहणी केली. दवाखान्यात जाऊन देखील या जखमी हॉटेल मालकाची त्यांनी पाहणी केली तर याप्रकरणी यावल पोलिसात रतन वानखेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध
शुक्रवारी डीवायएसपी अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी धानोरा तसेच किनगाव येथील मुख्य राज्य मार्गावर असलेले सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली. आरोपीच्या शोधाच्या दृष्टिकोनातून सदर सीसीटीव्ही फुटेज उपयोगी पडणार आहेत. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.
