मध्यप्रदेशच्या धर्तीवर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी : आमदार अमोल जावळे यांची विधी मंडळात मागणी


MLA Amol Javale भुसावळ (14 जुलै 2025) : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी अतिवृष्टी व वादळी वार्‍यांमुळे झालेल्या शेती नुकसानीसंदर्भात सभागृहात मुद्दा मांडला. सध्या महाराष्ट्रात शेती नुकसान भरपाई मिळण्यासाठी साधारण वर्षभराची प्रतीक्षा करावी लागते तर मध्यप्रदेशमध्ये अवघ्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर अर्धी नुकसानभरपाई जमा केली जाते.

महाराष्ट्रातही नुकसान नोंदणी प्रक्रियेत गती येऊन तातडीने मध्यप्रदेशच्या धर्तीवर भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार जावळे यांनी अधिवेशनात केली.

त्याचप्रमाणे, रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील काही गावांमध्ये मागील महिन्यात आलेल्या वादळी वार्‍यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत, ही बाबही त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली. शेतकरी 15 दिवसांपासून प्रतिक्षेत असून, त्यांना पुढील पेरणीचे नियोजन करायचे असल्याने पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

29 जून रोजी चिनावल, उटखेडा, रसलपूर या भागांमध्ये जिओ टॅगिंग व व्हेरिफिकेशन प्रक्रियेची अंमलबजावणीही वेळेवर झालेली नाही, याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

शेतकरी संकटात असताना त्यांना वेळेवर मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, त्यामुळे पंचनामे व नुकसानभरपाई प्रक्रियेला अधिक गतिमान करावे, अशी आमदार अमोल जावळे यांनी ठाम भूमिका मांडली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !