भुसावळ रेल्वे डीआरएम यांनी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेची केली पाहणी

DRM Eeti Pandey भुसावळ (20 जुलै 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेसह रेल्वेमार्गांची सध्याची स्थिती, सिग्नल आणि टेलिकॉम अद्ययावत कामांची प्रगती, लेव्हल क्रॉसिंग्जची सुरक्षितता, स्थानकांची स्वच्छता, ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) व्यवस्था आणि लहान पुलांची पाहणी करीत रेल्वे स्थानके स्वच्छ ठेवण्याच्या सूचना डीआरएम ईती पांडे यांनी दिल्यात. त्यांनी भुसावळ-मनमाड रेल्वेमार्गावर स्वतंत्र रेल्वे गाडीच्या निरीक्षण डब्याच्या खिडकीतून सखोल निरीक्षण केले. या तपासणीचा मुख्य उद्देश प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसाठी आवश्यक सुधारणा निश्चित करणे हा होता.
अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश
या निरीक्षणादरम्यान, डीआरएम पांडे यांनी रेल्वेमार्गांची सध्याची स्थिती, सिग्नल आणि टेलिकॉम अद्ययावत कामांची प्रगती, लेव्हल क्रॉसिंग्जची सुरक्षितता, स्थानकांची स्वच्छता, ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) व्यवस्था आणि लहान पुलांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी नांदगाव यार्डला भेट देऊन तेथील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये प्लॅटफॉर्म वाढीचे काम, लूप लाईन वाढवण्याचे काम आणि पुलाचे विस्तारीकरण यांचा आढावा घेण्यात आला. त्यांनी संबंधित अधिकार्यांना ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून रेल्वेची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.

मनमाड यार्डमध्ये तिसर्या रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या कनेक्टिव्हिटी कामाची आणि नवीन स्टॅबलिंग लाईनच्या उभारणीच्या प्रगतीचीही पाहणी डीआरएम पांडे यांनी केली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्गाची वहन क्षमता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
नाशिक रोड स्थानकाची पाहणी
डीआरएम पांडे यांनी नाशिक रोड स्थानकाची,तेथील परिसराची जागा आणि प्लॅटफॉर्मचीही पाहणी केली. त्यांनी स्थानकाची स्वच्छता, प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा आणि यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर विशेष भर दिला. याव्यतिरिक्त, त्यांनी स्थानकांवर स्वच्छता अभियान राबवण्याचे निर्देश दिले. या तपासणीमुळे रेल्वे प्रशासनाची प्रवाशांच्या सुरक्षिततेप्रती आणि त्यांना उत्तम सोयी पुरवण्याप्रती असलेली कटिबद्धता दिसून आली.
