10 हजारांची लाच भोवली : धुळे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी जाळ्यात

गणेश वाघ
Bribe of Rs 10,000 taken: Dhule Panchayat Samiti’s education extension officer caught in the trap धुळे (12 ऑगस्ट 2025) : विद्यार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदारांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे (43, रा.प्लॅाट नं. 5/ब, जय गुरुदेव नगर, वाडी भोकर रोड, देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सकाळी कार्यालयातच लाच स्वीकारताना अटक केली. या कारवाईने लाचखोर पुरते हादरले आहेत. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्या नावाने ही लाच मागण्यात आल्याने त्यांच्याही आता अडचणी वाढल्या आहेत.
असे आहे लाच प्रकरण
53 वर्षीय तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. गुरुवार, 7 रोजी धुळे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे यांनी शाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व प्राथमिक शिक्षणाधिकारी कुवर यांच्यासाठी दहा हजारांची लाच मागण्यात आली व याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 11 रोजी लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यात लाच मागण्यात आल्याचे मान्य करण्यात आले.
पंचायत समितीत स्वीकारली लाच
मंगळवार, 12 रोजी सकाळी धुळे पंचायत समिती कार्यालयात नांद्रे यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्या नावाने लाच मागण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लवकरच कुंवर यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, मकरंद पाटील, चालक जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.