धुळ्यात खाद्य तेलाच्या टँकरमधून एक कोटींची अवैध दारू जप्त : स्थानिक गुन्हे शाखेकडून ‘पुष्पा’ला बेड्या

पडद्याआडचे सूत्रधार यंत्रणेच्या रडारवर : कारवाईने अवैध तस्कर हादरले


Illegal liquor worth Rs 1 crore seized from edible oil tanker in Dhule : Local Crime Branch arrests ‘Pushpa’ धुळे (13 ऑगस्ट 2025) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे राजस्थानहून गुजरातमध्ये पुष्पा स्टाईल होणारी अवैध दारूची वाहतूक रोखत तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैधरित्या मद्याची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मोहनलाल पुरखाराम जाट (25, बरेवालातला, सदर बाडमेर, राजस्थान) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना खाद्य तेलाच्या टँकरमधून अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. मुंबई महामार्ग क्रमांक तीनवरील हॉटेल आकांक्षाजवळ संशयीत 22 चाकी टायर असलेला टँकर (जी.जे.12 बी.व्ही.5015) अडवल्यानंतर चालकाला विचारपूस केल्यानंतर त्याने वाहनात खाद्य तेल असल्याचे सांगितले. पथकाला टँकरबाबत पक्की माहिती असल्याने गॅस कटरद्वारे झाकण उघडल्यानंतर सहा कप्प्यांमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने 45 लाखांच्या ट्रकसह अवैध दारू मिळून एक कोटी 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.




यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलस निरीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चेतन मुंडे, पोलिस अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकूर, राहुल सानप, मयुर पाटील तसेच नरडाणा पोलिस ठाण्याचे अंमलदार रवींद्र मोराणीस, ललित पाटील, राकेश शिरसाठ, योगेश गीते व मोरे आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !