गजानन महाराज पुण्यतिथीसह ऋषिपंचमीनिमित्त भुसावळात हजारो भाविकांची दर्शनार्थ गर्दी


Thousands of devotees throng Bhusawal for darshan on the occasion of Rishi Panchami along with Gajanan Maharaj’s death anniversary भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : शहरात गुरुवारी संत गजानन महाराज पुण्यतिथी व ऋषी पंचमीनिमित्त शहरातील यावल रोडवरील गजानन महाराज ध्यान मंदिर व जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिर तसेच तापी नदी काठावरील सप्तऋषी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. सुमारे तीन हजार भाविकांनी सप्तऋषींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गजानन महाराज मंदिरात सुध्दा 3 हजारापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेत, महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला.

महिलांची सकाळपासून गर्दी
भुसावळातील तापी नदीवर ऋषी पंचमीनिमीत्त पंचक्रोशीतील महिला भाविकांनी सकाळी सात वाजेपासूनच स्नानासाठी गर्दी केली होती. मारोती मंदिराजवळील काठ, आसाराम बापू आश्रमाजवळील काठ, स्मशानभूमीजवळील तापी नदीच्या काठासह इंजीन घाटाकडे महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.




संत गजानन महाराज पुण्यतिथी ही ऋषीपंचमीला येत असल्याने हा दुहेरी संगम भाविकांना साधता येतो. या दिवसाचे औचित्य साधत शहरातील गजानन महाराज ध्यान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. पहाटेची आरती सुहास सरोदे यांनी केली. तसेच अभिषेक प्राजक्ता निखिल वैद्य यांनी केला. दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गजानन धरणगावकर यांनी आरती केली, सायंकाळी पाच वाजता अथर्वशीर्ष कार्यक्रम झाला.सायंकाळी सहा वाजेची आरती संदीप जोशी यांच्याहस्ते झाली. रात्री नऊ वाजता शेज आरती झाली.

एक क्विटल डाळीचे पिठले
यावल रोडवरील गजानन महाराज मंदिरात एक क्विटल डाळीच्या पीठाचे पिठले (बेसन) तयार करण्यात आले होते, पोळी, बेसन आणि एक बुंदीचा लाडू असा प्रसाद भाविकांना दिला जात होता. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. रात्री उशीरापर्यत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. या कार्यक्रमासाठी सर्व गजानन महाराज ध्यान मंदिराच्या सेवेकर्यांनी परिश्रम घेतले.

सप्तऋषी मंदिरात दर्शनासाठी गर्दी
शहरालगतच्या तापी नदी काठावर सप्तऋषींचे मंदिर आहे, गुरूवारी ऋषीपंचमी असल्याने पंचक्रोशीतून आलेल्या महिलांनी तापी नदीवर स्नान करून सप्तऋषींची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी महिलांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. ग्रामीण भागातून आलेल्या महिला भाविकांची वाहने तापी नदीवरील मारोती मंदिराजवळ लावल्या होत्या.

जामनेर रोडवर मंदिरात तीन हजार भाविकांनी घेतला प्रसाद
जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात सकाळी सहा वाजेपासून भाविकांनी गजानन महाराज पोथीचे पारायण केले.तर मंदिरात 4 क्विंटल गव्हाच्या पोळ्या व पिठले, लाडून असा प्रसादाचे वितरण करण्यात आले. सुमारे 3 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !