कारवाईत भुसावळ विभाग अव्वल : मध्य रेल्वेत 17 लाख फुकट्या प्रवाशांकडून शंभर कोटींहून अधिक दंड वसूल

Bhusawal division tops in ticket inspection in Central Railway: Fines of Rs 100 crore recovered भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेत भुसावळ विभाग अव्वल ठरला आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2025 या पाच महिन्यांत एकट्या भुसावळ विभागातून चार लाख 34 हजार प्रकरणांमध्ये 36 कोटी 93 लाख रुपयांचा विक्रमी दंड वसुल केला.
18 लाख प्रवाशांवर कारवाई
आर्थिक वर्ष 2025-26 च्या या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण 17 लाख 19 हजार अनधिकृत व विनातिकीट प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून तब्बल शंभर कोटी 50 लाख रुपये दंड वसूल केला आहे.
ऑगस्ट 2025 महिन्यातच दोन लाख 76 प्रवासी विनातिकीट फुकटे प्रवास करीत असतांना तपासणीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. हे आकडे ऑगस्ट 2024 च्या तुलनेत 18 टक्क्यांनी जास्त आहेत. त्यांच्याकडून 13 कोटी 78 लाख रुपयांचा दंड वसूल झाला, जो मागील वर्षीच्या आठ कोटी 85 लाख रुपयांच्या तुलनेत तब्बल 55 टक्क्यांनी अधिक आहे.

विभागनिहाय झालेली कारवाई अशी
मुंबई विभागाने सात लाख 3 हजार प्रकरणांतून 29 कोटी 17 लाख, नागपूर विभागाने 1.85 लाख प्रकरणांतून 11.44 कोटी, पुणे विभागाने 1.89 लाख प्रकरणांतून 10.41 कोटी, सोलापूर विभागाने 1.04 लाख प्रकरणांतून 5.01 कोटी तर मुख्यालयाने 1.04 लाख प्रकरणांतून 7.54 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मोबाईल अॅपचा वाढला वापर
तिकीट फसवणूक रोखण्यासाठी मध्य रेल्वेने अलीकडेच मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध असलेली स्थिर क्युआर कोड प्रणाली बंद केली आहे. कारण या प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे आढळले होते.त्यामुळे पेपरलेस तिकीटिंगमधील फसवणुकीवर नियंत्रण मिळविता आले आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना वैध तिकीट खरेदी करावे. तिकीटाशिवाय प्रवास करणार्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.
