2400 रुपयांची लाच भोवली : तळोदा उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल जाळ्यात

गणेश वाघ
Bribe of Rs 2400: Junior accountant at Taloda Sub-Treasury Office caught in the trap भुसावळ (17 सप्टेंबर 2025) : वेतनवाढ फरकाचे देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात तसेच प्रोत्साहन भत्त्याचे देयक सहायक लेखाधिकारी यांच्याकडे पाठविल्याच्या मोबदल्यात दोन हजार चारशे रुपयांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारताना तळोदा उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापालास नंदुरबार एसीबीने बुधवारी सायंकाळी उशिरा कार्यालयातच अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भैरवनाथ शिवाजी मोरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
21 वर्षीय तक्रारदाराच्या यांची आई शासकीय आश्रमशाळा,ब ोरद, ता.तळोदा येथे कामाठी पदावर नेमणुकीस आहे. आरोपी भैरवनाथ मोरे याने तक्रारदाराच्या आईचे गतवर्षी वेतनवाढीचे फरकाचे देयक तयार करून दिले. तक्रारदार यांच्या आईचे 2016 पासून प्रोत्साहन भत्त्याचे देयक एक लाख 43 हजार 250 रुपये शासकीय आश्रमशाळा, बोरद, ता.तळोदा कार्यालयाकडून उप कोषागार कार्यालय, तळोदा येथे मंजुरीसाठी सादर केले. हे देयक मंजुरीसाठी उप कोषागार कार्यालयातील सहायक लेखा अधिकार्यांकडे पाठवण्यात आले.
कार्यालयातच स्वीकारली लाच
तक्रारदार यांच्या आईचे वेतनवाढीचे फरकाचे देयक तयार करून दिल्याच्या व प्रोत्साहन भत्त्याचे देयक मंजुरीसाठी सहायक लेखाधिकारी यांच्याकडे पाठविल्याच्या मोबदल्यात एकूण 2400 रुपये लाच मागण्यात आली व बुधवार, 17 रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला. आरोपी उपकोषागार कार्यालय, तळोदा येथे बुधवारी सायंकाळी उशिरा लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तसेच झडती लाचेच्या रकमे व्यतिरीक्त दोन हजारांची रोकड व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात एएसआय विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार देवराम गावीत, हवालदार हेमंकुमार महाले, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
