चोरीच्या 28 दुचाकींसह धुळ्यातील चौकडी जाळ्यात : धुळे जिल्हा पोलिस दलाची कामगिरी

Dhule quartet caught with 28 stolen bikes: Dhule District Police Force’s performance धुळे (22 सप्टेंबर 2025) : जिल्ह्यातून सातत्याने दुचाकी चोरीचे गुन्हे घडत असल्याने धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी नाकाबंदीचे आदेश दिले. धुळे तालुका, दोंडाईचा व नरडाणा हद्दीत नाकाबंदी दरम्यान दुचाकी चोरट्यांची चौकडी पोलिसांच्या हाती लागली असून त्यांच्याकडून 14 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या तब्बल 28 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
या पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल
आरोपींच्या अटकेनंतर धुळे तालुका पोलिस ठाणे हद्दीतील सात, दोंडाईचा हद्दीतील आठ तर नरडाणा पोलिस ठाणे हद्दीतील 13 गुन्ह्यांची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. आरोपींनी हिरोहोंडा कंपनीच्या महागड्या दुचाकी चोरी केल्या असून त्यात होंडा शाईन, हिरोहोंडा, एचएफ डिलक्स, यामाहा एव्हेंजर आदी गाड्यांचा समावेश आहे.
या कुख्यात आरोपींना अटक
सईम निहाल अहमद अन्सारी (रा.दिलदार नगर, 210, गल्ली नं. 11, धुळे), जुनेद शा फिरोज शा फकिर (कुंभार गल्ली, रनाळे, हल्ली मुक्काम एकता सर्कल, भोला बाजार, 80 फुटी रोड, धुळे) व विष्णू किसन वळवी (म्हसल्ल्या मारुती नगर, दोंडाईचा, ता.शिंदखेडा), तुषार अमृत खैरनार (वाघाडी, ता.शिंदखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, आरोर्पीताविरुध्द इतर जिल्हयातही गुन्हे दाखल आहेत तर जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलमधुन धुळे, अमळनेर येथील दाखल गुन्हयांत हस्तांतर करण्याची कारवाई केली जात आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे, नरडाणा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश मोरे व त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी केली.
