ऊस तोड ठेकेदाराचे पैसे थकवल्याने तळोद्यातील सरपंचाचे अपहरण : 800 किलोमीटर अंतरावर जावून पोलिसांकडून सुटका

Sarpanch kidnapped in Taloda taluka : Police rescue him within 24 hours तळोदा (23 सप्टेंबर 2025) : ऊसतोड ठेकेदारांचे अडकलेले पैसे मिळत नसल्याने त्यांनी तळोदा तालुक्यातील सावर्यादिगर सरपंच दिलीप पावरा यांचे फिल्मी स्टाइलने गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी अपहरण केले मात्र या संदर्भात संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर नंदुरबार पोलिस प्रशासनाने कॉल लोकेशनद्वारे 800 किलोमीटर दूर असलेल्या सांगली जिल्ह्यातील एका गावातील गायीच्या गोठ्यातून सरपंच पावरा यांनी 24 तासात सुटका केली.
काय घडले सरपंच पावरांसोबत ?
ऊसतोड ठेकेदाराचे धडगाव तालुक्यातील काहींसोबत जुने आर्थिक व्यवहार होते. या व्यवहारातून अडकलेले पैसे काढण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडनिपाणी येथील ऊसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाळे, त्याचे दोन भाऊ, इतर दोन साथीदार आणि स्थानिक दोघांच्या मदतीने सरपंच पावरा यांचे अपहरण करून त्यांना ओलिस ठेवण्याचा कट रचला. त्यानुसार धडगाव शहरातून संशयितांनी सरपंच पावरा यांना गुरुवार, 18 सप्टेंबरला फसवून एका वाहनात बसवले. त्यानंतर त्यांनी सरपंच पावरा यांना मारहाण केली तसेच दोन्ही हातपाय बांधून त्यांचे अपहरण केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
24 तासात केली सुटका
अपहरणकर्त्यांनी सरपंच पावरा यांना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडनिपाणी गावात नेऊन गाईच्या गोठ्यात डांबल्याचे उघड झाले. त्यानंतर धडगाव पोलिसांचे विशेष पथक, आदिवासी जनजागृती टीम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा मदतीने 19 सप्टेंबरला सरपंच पावरा यांना पोलिसांनी त्यांना सोडवले. या प्रकरणी संशयितांवर गुन्हे नोंदवण्यात आला आहे.
यांनी केली सरपंचांची सुटका
सरपंच पावरा यांच्या सुटकेसाठी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, माजी खासदार डॉ. हीना गावित, पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील, हवालदार राकेश गिरासे, भाजपचे सुभाष पावर, आदिवासी जनजागृती टीमचे अर्जुन पावरा, राकेश पावरा, शिक्षक रामा पावरा, फतन भंडारी, बुगा पावरा लोकेश पावरा यांनी प्रयत्न केले. त्यांना कुरळप स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी सहकार्य केले.
