कडक सॅल्यूट : धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतप्रसंगी पोलिस दलाकडून सहाय्यता निधीसाठी दोन लाखांची मदत

गणेश वाघ
Strong salute: Police donates Rs 2 lakh to relief fund on welcoming Chief Minister in Dhule धुळे (27 सप्टेंबर 2025) : राज्यात सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे तर विदर्भासह मराठवाड्यात शेतकर्यांची शेतीही वाहिली आहे. शेतकर्यांप्रती संवेदना जोपासत व माणुसकी धर्म जोपासत धुळे जिल्हा पोलिस दलाने धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हार-तुर्यांचा वायफळ खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल दोन लाखांची मदत केली आहे. धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी धुळे विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करीत प्रसंगी त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
‘खाकी’तील माणुसकीला राज्याचा सलाम
केवळ कायदा-सुव्यवस्थाच अबाधीत ठेवणे ही जवाबदारी न मानता आपणही समाजाचे देणं लागतो या निर्व्याज भावनेतून धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला हार-तुर्यांऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीची भावना बोलून दाखवली व त्याच क्षणी 50 अधिकार्यांनी पदरमोड करीत आपल्या पगाराचा काही हिस्सा त्यासाठी देण्याची तयारी दर्शवली. पाहता-पाहता मदतीचा आलेख उंचावून तो दोन लााखांवर पोहोचला व त्याबाबतचा धनादेश तयार करून तो धुळे दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना सोपवण्यात आला. पोलिस दलाच्या या कृतीचे मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक करीत त्यांना धन्यवादही प्रसंगी दिले.
संवेदनशील, कणखर व हळव्या मनाचा अधिकारी
धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे हे जेव्हढे संवेदशील आहेत तितकेच कणखरदेखील आहेत. गुन्हेगारांवर कायद्याचा त्यांनी नेहमीच बडगा उगारून कायद्याचा अंकुश निर्माण केला आहे तर पोलिस भरतीचे स्वप्न पाहणार्या तरुणाने अलीकडेच टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनादेखील वेदना ऐकून आलेल्या अश्रूंमुळे त्यांच्यातील हळव्या मनाचा अधिकारीदेखील उभ्या जिल्ह्याने अनुभवला. यानंतर तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून त्यांनी तरुणांना केलेले मार्गदर्शनदेखील तितकेच तोला-मोलाचे ठरले. अशा एक ना अनेक प्रसंगातून धुळे जिल्हावासीयांना धीवरे यांच्या कार्याची प्रचिती आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पोलिस दलाने केलेली निर्व्याज भावनेतील मदत देखील खाकीचा व धुळे जिल्हा पोलिस दलाचा निश्चितपणे नावलौकीक वाढवणारी आहे हेदेखील तितकेच खरे !
