ठाकरेंना देश ओळखतो ; त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही ; उद्धव ठाकरेंची रामदास कदमांवर टीका

The country knows Thackeray ; Will not answer that traitor and scoundrel; Uddhav Thackeray’s criticism of Ramdas Kadam पुणे (4 ऑक्टोबर 2025) ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही, असे टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर केली आहे.
पुण्यात माध्यमांशी साधला संवाद
उद्धव ठाकरे आज पुणे दौर्यावर आहेत. त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी दसरा मेळावा, भारत-पाक संबंध, हिंदुत्व, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची धोरणे, रामदास कदम यांची टीका आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, कालचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. हे केवळ माझे श्रेय नाही. पावसामुळे शिवाजी पार्कवर चिखल झाला होता. तळे झाले होते. पण त्याही स्थितीत केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील शिवसैनिक आले होते. त्यांनी स्वतःची चटणी भाकरी आणली होती. आपल्याकडे बिर्याणी वगैरेची काही सोय नाही. जे येतात ते स्वकष्टाचे येतात. पाऊस पडत असतानाही कुणीही जागचे हलले नाहीत. शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत. बांधावरून उडी मारली की माणूस बाहेर जाऊ शकतो त्यामुळे आलेल्या लोकांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जी इतरांना कदाचित वाटत असेल, असे ते एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले.
शिवाजी पार्कवरच सभा घेण्यास बाळासाहेब ठाम
ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा 1966 मध्ये पहिला दसरा मेळावा झाला. मी सहा वर्षांचा होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवाजी पार्कवर तो घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर काहींनी एवढे मोठे मैदान भरेल का? अशी शंका घेतली. त्यांनी हॉल किंवा दुसर्या एखाद्या छोट्या मैदानात सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. पण बाळासाहेबांनी ही सभा शिवाजी पार्कवरच घेण्यावर ठाम राहिले. मी वेडा की लोकं वेडी हे पाहून घेऊ, असे ते तेव्हा म्हणाले होते. आता हे दोघेही वेडे नव्हते हे स्पष्ट झाले आहे. हा प्रवास आजही सुरू आहे. त्यामुळेच पाऊस सुरू असतानाही लोकं जागचे हलले नाही.
देशाला आता खर्या पंतप्रधानांची गरज
आपल्या देशाला आता पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. आत्ता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत. ते देशाचे नाहीत. देशाचे म्हणून कारभार कुठे सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी काय गुन्हा केला? की थेट त्यांच्यावर रासुका लावण्यात आला. त्यांनी एवढे मोठे राष्ट्रविघातक त्यांनी कोणते काम केले? काल परवापर्यंत ते पंतप्रधानांची स्तुती करत होते. तेव्हा ते देशप्रेमी होते. पण नंतर काय घडले? सोनम वांगचुक यांनी चूक केली असेल, तर मणिपूरमध्ये कुणी चूक केली? लेह, लडाखमध्ये काय स्थिती आहे? तेथील परिस्थिती शांत झाली आहे का? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या हातात मशाली आहेत. पण दुर्दैवाने त्याची एकही बातमी येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ते लव्ह जिहाद असे कसे?
उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आमच्या अंगावर येतात. पण त्यांनी त्यांच्याच वंशावळी पाहून कुणी काय सोडले हे पहावे. आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो. मग आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? आम्ही भाजपला सोडले म्हणून हिंदुत्व सोडले असे असेल, तर मग सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागलेली विषारी फळे हेच त्याचे फलित आहे का? हे सांगावे. कारण, स्वतः मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्यकांना सदस्यत्व देते. त्यांना सौगात ए मोदी देते. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडले. तुम्ही सौगात ए नेहरू कधी पाहिले का? सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकले का? मग सौगात ए मोदी वाटणारे हिंदुत्ववादी कसे?
तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत. ज्यांनी हिंदूंना मारले त्या पाकसोबत तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, तर मग तुम्ही चंद्राबाबू नायडूंसोबत गेलात, ते नायडू हिंदुत्ववादी आहेत का? असे विविध प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर शरसंधान साधताना उपस्थित केले. भाजपने जे केले अमर प्रेम आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद, असे कसे असू शकते? असे ठाकरे म्हणाले.
मनसेसोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी व राज 2005 मध्ये वेगळे झालो होतो. त्यानंतर आत्ता एका मुद्यावर आम्ही एकत्र आलो. त्यामुळे आता रोज उठून आम्ही एकत्र आलो, आम्ही एकत्र आलो असे सांगण्याची गरज नाही. आम्हाला एकत्र यायचे नसते तर 5 जुलै रोजी झालेला मेळावा झालाच नसता. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. मराठी माणूस एकवटल्याने काय होणार? याची त्यांना भीती वाटत आहे.
रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देणे टाळले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देणे टाळले. मी गद्दार व नमकहरामांना उत्तर देत नाही. तो माणूस कसा आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मला त्याला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. कारण, ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला व हरामखोराला मी काही उत्तर देत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
