राजकारणात गुंडगिरीला जागा नाही ; गुन्हा केला असेल तर शिक्षा मिळणारच ! : अजित पवार


There is no place for hooliganism in politics ; If a crime has been committed, it will be punished!: Ajit Pawar पुणे (10 ऑक्टोबर 2025) : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत राजकारणात गुंडगिरीला थारा नसल्याचे म्हणत गुन्हा केला असल्यास शिक्षा होणार असल्याचे म्हटले आहे.

कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर राज्यभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महायुतीतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

पुण्यात शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांनी नीलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या संदर्भात विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, मी स्वतः पोलिस आयुक्तांना सांगितले आहे, कोण-कोणत्या पक्षाचा, कोणाचा कार्यकर्ता, कोणाच्या जवळचा आहे, हे काहीही बघायचे नाही. ज्याने कायदा हातात घेतला असेल, नियम मोडले असतील, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. ते म्हणाले की, कायद्यापुढे सर्व समान आहेत, आणि या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.

कायदा सर्वांसाठी समान
कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणी मंत्री, कार्यकर्ता, किंवा कोणत्याही पक्षाचा असो, गुन्हा केला असेल तर शिक्षा होणारच. पुण्यात गुंडगिरी वाढू देणार नाही. सरकार कोणाचेही असो, कायदा आणि पोलिस त्यांचे काम निष्पक्ष राहिले पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

शिफारस असली तरी परवाना दिला नाही
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्यासाठी शिफारस केली होती, असा आरोप होत आहे. यावर अजित पवार म्हणाले की, मला सांगितले गेले की, काही लोकांनी शिफारस केली होती, पण पोलिस आयुक्तांनी शस्त्र परवाना दिला नाही आणि मी त्यांचे कौतुकच केले. कारण कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. पुण्यातील असो, बाहेरच्या महाराष्ट्रातील असो, गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतही हा विषय आला होता, आणि सर्वांची भूमिका एकच होती, दोषींवर कोणतीही माया नाही.

राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही
अजित पवारांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, राजकीय नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी निर्णय घेऊ नयेत. कायदा मोडणार्‍यांवर कारवाई करायची, एवढेच काम आहे. शिफारस कोणाची आहे हे गौण आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या 32 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी नेहमी सांगतो, एखाद्या फाईलवर माझी शिफारस असली, तरी जर ती वस्तुस्थितीला धरून नसेल, तर सचिव किंवा पोलिसांनी लक्षात आणून द्यावे. जर तरीही चुकीच्या शिफारशीवर निर्णय झाला, तर तो मंत्री दोषी ठरेल. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे आता योगेश कदम यांच्या भूमिकेवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !