एकनाथ शिंदेंना प्रसिद्धीचे वेड : उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता टोला

Eknath Shinde is obsessed with fame: He insults Uddhav Thackeray without mentioning his name मुंबई (10 ऑक्टोबर 2025) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसिद्धीचे वेड लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.
पक्षाचा झाला मेळावा
शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुंबईतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांचे शिवसेनेत स्वागत. मला जे बोलायचे होते ते मी भर पावसात शिवाजी पार्कला बोललो आहे. आत्ता तेच बोलत-बोलत मी पुढे जाणार आहे. आज तुम्ही एका उत्साहाने व प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलात. काही जणांनी दसरा मेळाव्यात मला तुम्ही पुढचा कार्यक्रम काय देणार? असा प्रश्न केला होता. पुढचा कार्यक्रम हाच आहे की, खरी देशभक्ती काय आहे? खरे हिंदुत्व काय आहे? हे आपल्याला सर्वांना समजून सांगायचे आहे. कारण, काही जणांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या गेल्यात.
एकनाथ शिंदेंना प्रसिद्धीचे वेड लागले
उद्धव ठाकरे यांनी यावेळी ब्रिटीश पंतप्रधान स्टार्मर यांच्या मुंबई दौर्याचा दाखला देत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते त्यांचे नाव टाळत म्हणाले, तुम्ही येताना पाहिले असेल की, संपूर्ण परिसर होर्डिंग व बॅनरने बरबटून टाकण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते. पण त्यांचे स्वागत आपले उपमुख्यमंत्री करत होते. अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का? बोललास तरी का? आज सकाळी संजय राऊत चांगले बोलले. ते बॅनर पाहिले की असे वाटते की, ब्रिटनच्या पंतप्रधानांची शिंदे सेनेत प्रवेश केला की काय? काही सांगता येत नाही. कारण, यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे म्हणजे जाहिरातबाजी करण्याचे व स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याचे वेड लागले आहे.
