भुसावळ-खंडवा मार्गावर हवी मेमू : दिवाळीमुळे प्रवासी गर्दी वाढली


Need for MEMU on Bhusawal-Khandwa route: Passenger rush increased due to Diwali भुसावळ (10 ऑक्टोबर 2025) : दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तत्काळ भुसावळ-खंडवा मार्गावर मेमू गाडी सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवाशांची गर्दी वाढली
सध्या भुसावळ विभागातून अकोला, नाशिक, इगतपुरी आणि नंदुरबार यांसारख्या विविध मार्गांवर मेमू गाड्या नियमितपणे धावत आहेत. ज्यामुळे कमी अंतराच्या प्रवासासाठी प्रवाशांची सोय झाली आहे मात्र अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खंडवा मार्गावर सध्या एकही मेमू गाडी उपलब्ध नाही.

या मार्गावरील प्रवाशांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेवर अवलंबून असतात आणि सध्या असलेल्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. प्रवाशांची ही मागणी केवळ तात्पुरती नसून या मार्गावर नियमितपणे मेमू सेवा सुरू करण्याची गरज आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल आणि रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन करणेही सोपे होईल.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने खंडवा-नाशिक गाडी कुंभमेळ्यादरम्यान चालवण्याची तयारी दर्शविली आहे परंतु प्रवाशांची मुख्य मागणी भुसावळ-खंडवा मेमू गाडी तातडीने सुरू करण्याची आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन लवकरच या मार्गावर मेमू गाडी सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !