पोलिस हवालदाराने चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या बनावट नोटा
मिरज पोलिसांनी मोठी कारवाई : पोलिस हवालदारासह पाच जण अटकेत

Police constable prints fake Rs 1 crore notes in tea shop मिरज (11 चॉक्टोबर 2025) : पोलिस दलातील हवालदाराने टोळक्याला सोबत घेत स्वतःच्या चहा दुकानात तब्बल एक कोटींच्या बनावट नोटांची छपाई केली. याप्रकरणी हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पोलिसांनी ही कारवाई केली. हवालदारसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
एक कोटींचा ऐवज जप्त
आरोपींकडून 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण 1 कोटी 11 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ठिकाणी सापळा रचत छापा टाकला आणि सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस 42 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, या बनावट नोटांची छपाई कलर झेरॉक्स मशीनवर करण्यात येत होती. या प्रकारात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या साखळीचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
चहाच्या दुकानात नोटांची छपाई
या बनावट नोटांची छपाई कोल्हापूर शहरातील पोलिस हवालदाराच्या चहाच्या दुकानात केली जात होती. हे दुकानच नोटा तयार करण्याचा अड्डा होता. दुकानातील च बनावट नोटा कुठ-कुठे फिरवल्या गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे याचा तपास केला जात आहे. पाचशे रुपयांच्या खर्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्यात येत होत्या. प्रकरण उघडकीस आणणार्या पोलिसांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले आहे.
आरोपींना पोलिस कोठडी
मुख्य सूत्रधार पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (44, रा. कसबा बावडा) असून तो पोलिस दलात वाहन चालक असून त्याच्यासह सुप्रीत काडापा देसाई (रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (33, कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (40, टाकाळा), सिद्धेश जगदीश म्हात्रे (38, रा. मालाड पूर्व, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
