पालजवळील बोर घाटात भीषण अपघात : क्रुझर उलटल्याने एक ठार, 12 जखमी

Fatal accident at Bor Ghat near Pal : One killed, 12 injured as cruiser overturns पाल, ता.रावेर (11 ऑक्टोबर 2025) : पाल-खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात भरधाव क्रुझरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर 11 जण जखमी झाले. हा अपघात शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. विजय धर्मा राणे (41, अंजनसोंडे, ता.भुसावळ) असे मृताचे नाव आहे.
असा घडला अपघात
अंजनसोंडे येथून काही शेतकरी क्रुझर वाहन (एम.एच.19 सी.एफ.3920) ने पालकडे निघाले होते मात्र चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला घसरून झाडांना धडकले आणि उलटले. या अपघातात विजय धर्मा राणे यांचा मृत्यू झाला तर 11 प्रवासी जखमी झाले.
अपघातात जखमींना प्राथमिक उपचारासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, या अपघातात पद्माकर पाटील (62), गणेश चौधरी (64), गोपाळ कोळी (71) व चालक प्रशांत चौधरी (48) आदी जखमी झाले. काही जखमींवर भुसावळातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे अंजनसोंडे गावात शोककळा
या अपघातानंतर अंजनसोंडे गावात शोककळा पसरली. मृत्यूमुखी पडलेले विजय राणे हे गावात सामाजिकदृष्ट्या सक्रिय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.1
