भुसावळ तालुका पंचायत समिती निवडणूक : आरक्षणामुळे तीन वर्षांपासून गुडघ्याला बाशींग बांधलेल्या ‘प्रस्थापितांना हादरा’

Bhusawal Taluka Panchayat Samiti Election : A shock to the ‘established’ who have been knee-deep in bashing for three years due to reservation भुसावळ (11 ऑक्टोबर 2025) : पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव निघाल्याने तालुक्यातील राजकीय चित्र बदलले आहे. गेल्या तीन वर्षांपासून गुडघ्याला बाशींग बांधून बसलेल्या अनेक प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे तर राजकारणातून बाद झालेल्या म्हणजे 2007 पूर्वी राजकारणात सक्रिय व नंतर पडद्याआड गेलेल्या काही जुन्या उमेदवारांनाही भागोदय होणार आहे. एस.टी.प्रवर्गात येणार्या तब्बल 231 जातींपैकी प्रामुख्याने कोळी, भिल्ल, तडवी, पारधी, गौंड, राजगौंड, ठाकूर व पावरा या आठ जाती भुसावळ तालुक्यात आहेत, यातील गावपातळीवर राजकारण करणार्यांना आता तालुका पातळीवर राजकारणाची संधी मिळणार आहे.
गेल्या निवडणुकीत अशी होती स्थिती
भुसावळ पंचायत समितीवर गेल्या 2017 च्या निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण तर नंतरच्या अडीच वर्षांत महिला राखीव आरक्षण होते. या निवडणुकीत भाजपने सहा पैकी कुर्हा, वराडसीम, साकेगाव, हतनूर या चार जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीला कंडारी व शिवसेनेला तळवेल प्रत्येकी एक जागा मिळाली होती.
चौघांना मिळाले होते सभापतीपद
2017 च्या निवडणुकीत सहा पैकी चार जागांवर भाजपने बहुमत मिळवले होते. यामुळे पहिल्या अडीच वर्षांसाठी सुनील महाजन यांना सभापती पदाची संधी मिळाली तर उर्वरित अडीच वर्षांत मनिषा भालचंद्र पाटील, प्रीती मुरलीधर पाटील व वंदना उन्हाळे यांना सभापती पदाची संधी मिळाली. एकंदरीत पाच वर्षांत चारही उमेदवारांना सभापती व उपसभापती पदाचीही संधी मिळाली होती.
ही नावे सध्या चर्चेत
आगामी निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला असला तरी एसटी प्रवर्गातील कोळी समाजाला यंदा प्रतिनिधीत्व मिळणार असल्याने समाजात आनंदाचे वातावरण आहे. साकरी येथील निर्मला नारायण कोळी, वंदना सदानंद उन्हाळे, कठोर्याचे माजी सरपंच जितेंद्र कोळी यांच्या पत्नी, जाडगावचे गणेश कोळी यांच्या पत्नी, कठोर्याच्या उपसरंपच सीमा वासुदेव कोळी, वेल्हाळेचे संतोष सोनवणे यांच्या पत्नी यांचीही नावे सध्या चर्चेत आली आहेत. आगामी काळात यात पुन्हा डझनभर इच्छूकांची भर पडू शकेल.
प्रस्थापितांना बसला हादरा
भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकारणात सक्रिय असलेल्या सुनील महाजन, गोलू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील आदींसह अन्य अनेक प्रस्थापितांना हादरा बसला आहे. तालुक्यातील राजकारणावरील प्रस्थापितांची पकड यामुळे सैल होणार आहे. भुसावळ पालिका आरक्षणानंतर तालुक्याचे मिनी मंत्रालयाच्या सभापती पदावरही आरक्षण जाहिर झाल्याने काहींचा हिरमोड झाला आहे.
हतनूर व कुर्हा गणावर वर्चस्व
एस.टी.प्रवर्गात येणार्या कोळी समाजाची तालुक्यातील कुर्हा व हतनूर या दोन पंचायत समिती गणांवर मजबूत पकड राहिली आहे. यापूर्वी कोळी समाज या दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये किंगमेकर ठरला आहे. यामुळे या दोन्ही गणांमध्ये एस.टी.महिला आरक्षण निघाल्यास चुरस निर्माण होईल. सहा पैकी एक जागा एसटीसाठी राखीव राहिल, त्या गणातील विजयी उमेदवाराला थेट सभापतीपदाची संधी मिळेल !
