महानगरीत बॉम्बची अफवा : जनरल डब्यातील शौचालयात आयसीससह पाकिस्तान जिंदाबादचा उल्लेख !

मुंबई ते भुसावळ दरम्यान सर्वच स्थानकावर गाडीची कसून तपासणी : खोडकरपणा की देशविघातक शक्तींचे कृत्य : यंत्रणेकडून कसून तपास


Bomb rumor in the metropolis: ISIS and Pakistan Zindabad mentioned in the toilet of the general compartment! भुसावळ (12 नोव्हेंबर 2025) : डाऊन 22177 मुंबई-चेन्नई महानगरी एक्स्प्रेसच्या डब्यात आयसीसी व पाकिस्तान जिंदाबाद लिहिल्याचा संदेश व गाडीत बॉम्ब असल्याचा संशय निर्माण करणारा धमकीवजा संदेश सापडल्याने सुरक्षा यंत्रणांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. विशेष म्हणजे मुंबई येथून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुंबई ते भुसावळ दरम्यानच्या विविध स्थानकांवर यंत्रणांनी काटेकोरपणे गाडीची तपासणी केली तसेच संशयीतांवर लक्ष केंद्रीत केले मात्र कुठेही काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.

काय घडले महानगरी एक्स्प्रेसमध्ये
महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीने ‘आयसीस’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे शब्द लिहिले तसेच या मजकुरात ‘गाडीत बॉम्ब’ असल्याचा इशारा देण्यात आला. हा प्रकार दादर स्थानकावर रेल्वे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आला. त्यानंतर संपूर्ण मार्गावरील रेल्वे स्थानकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले.

भुसावळ स्थानकावर कसून तपासणी
बुधवारी सकाळी सुमारे 8.30 वाजता गाडी भुसावळ स्थानकावर दाखल होताच रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी संयुक्त तपास मोहीम सुरू केली. श्वानपथक तसेच बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅण्ड डिस्पोजल स्कॉड पाचारण करून प्रत्येक डब्याची काटेकोर तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या सामानाचीही कसून झडती घेण्यात आली.

सुरक्षा यंत्रणांनी गाडीतील प्रत्येक कोपरा, आसन, लगेज रॅक आणि शौचालय तपासून पाहिले. जवळपास तासभर चाललेल्या या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळले नाही. त्यानंतर सकाळी 9 वाजता महानगरी एक्स्प्रेसला पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.

कुणाचा तरी खोडसाळपणा
रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी.आर.मीना म्हणाले की, संपूर्ण गाडीची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली असून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. ही घटना खोडसाळ कृत्य असण्याची शक्यता आहे, मात्र सर्व बाजूंनी सुरक्षा यंत्रणांकडॅन तपास सुरू आहे.

देशविरोधी मजकूर पुसलेला आढळला
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायरकर यांनी सांगितले की, गाडीत लिहिलेला ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ असा मजकूर कोणीतरी पुसून टाकलेला होता. हा प्रकार जाणीवपूर्वक असावा की, त्यामागे काही मोठा कट आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेनंतर जळगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक आणि इतर प्रमुख स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. प्रवाशांची ओळखपत्रे तपासून गाड्यांमध्ये संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवावा आणि संशयास्पद गोष्टी तात्काळ कळवाव्यात असे आवाहन केले आहे

सुरक्षा यंत्रणा सज्ज
घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर सामान्य झाली. तरीदेखील सर्व रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात ठेवण्यात आले असून तपास पूर्ण होईपर्यंत हाय अलर्ट कायम राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !