भातखंडे खुर्दमध्ये घरफोडी : चार तासात आरोपी जाळ्यात
House burglary in Bhatkhande Khurd : Accused caught in four hours जळगाव (12 नोव्हेंबर 2025) : पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्दमध्ये घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली होती मात्र पाचोरा पोलिसांनी अवघ्या चार तासात घरफोडीची उकल करीत स्थानिक आरोपीला अटक केली. कन्हैय्या विनोद कुमावत (25, रा.भातखंडे खुर्द) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बंद घराला केले टार्गेट
सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी भातखंडे खुर्द येथील रहिवासी सोपान भिकन कुमावत (51) हे लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत 41 हजार 500 रुपये किंमतीची रोकड चोरून नेली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पाचोरा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी कन्हैय्या विनोद कुमावत (25, रा. भातखंडे खुर्द) याचा शोध घेतला. त्याला भातखंडे खुर्द येथे ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण 41 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल अवघ्या चार तासात जप्त केला आहे. पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.


