15 हजारांची लाच भोवली : मांजरोदच्या मुख्याध्यापकासह शिक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of Rs 15,000 : Manjarod principal and teachers caught by Dhule ACB धुळे (12 नोव्हेंबर 2025) : स्थगित केलेली वेतवाढ सुरू करावी तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील मांजरोदच्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील (56) व उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील (47) यांना बुधवार, 12 रोजी सायंकाळी धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे जनता प्रसारक संस्था, बेटावद, ता.शिंदखेडा संचलित महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद येथे कार्यरत आहेत. त्यांची जुलै 2023 पासून एक वर्षासाठी वेतनवाढ स्थगित करण्यात आली व तक्रारदाराला 12 वर्ष होवूनही वरिष्ठ वेतनवाढ लागू केली नसल्याने तक्रारदाराने मुख्याध्यापक कैलास पाटील यांची भेट घेतली असता दोन्ही कामांसाठी 15 हजारांची लाच मागण्यात आली व लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, असेदेखील सांगितल्याने धुळे एसीबीकडे मोबाईलद्वारे तक्रार नोंदवली. लाच पडताळणी अंती तक्रारदाराकडून गोपाल पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व नंतर मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.


