युवक व्यसनमुक्तीसाठी इस्कॉनचा पुढाकार : भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
ISKCON’s initiative for youth addiction relief : Textile Minister Sanjay Savkare in Bhusawal भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ शहरात भक्ती, संस्कृती आणि सेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस (इस्कॉन) भुसावळतर्फे उभारण्यात येणार्या‘वृंदावन इन भुसावळ या भव्य मंदिराच्या भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात बुधवारी सकाळी मोहितनगर परिसरात भक्तिमय वातावरणात पार पडला. इस्कॉनतर्फे युवकांच्या व्यसनमुक्तीसाठी घेतलेला पुढाकार हा खरच कौतुकास्पद आहे. इस्कॉनतर्फे शहरात सात कोटी रुपये खर्च करून तयार केले जात असलेल्या या मंदिरामुळे शहराच्या लौकीकात भर पडणार आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बुधवारी भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी केले. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
इस्कॉनच्या माध्यमातून वैदीक संस्कार
मोहित नगरात झालेल्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, सध्याचा युवक मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनतेकडे झुकत आहे मात्र इस्कॉनच्या माध्यमातून युवकांसाठी वैदिक संस्कार, ध्यान आणि अध्यात्मावर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे युवक व्यसनांपासून दूर राहून सशक्त, नैतिक आणि समाजाभिमुख जीवन जगतील.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या वेळी सांगितले की, इस्कॉनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भुसावळसारख्या शहराची मंदिरासाठी निवड केली, हे शहराचे भाग्य आहे. तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च करून इतके सुंदर आणि आधुनिक मंदिर उभे राहणे हा भुसावळचा गौरव आहे.त्यांनी पुढे सांगितले की, या मंदिरामुळे भुसावळ शहराची केवळ आध्यात्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळखही उजळून निघेल.
भक्तिमय वातावरणात भूमिपूजन
बुधवारी सकाळी आठ वाजता कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर इष्ट विधी, अनंतशेष स्थापना आणि भूमिपूजन पार पडले.हरे कृष्ण, हरे राम या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. असंख्य भाविकांनी श्रीकृष्णनामाचा अखंड उच्चार करून वातावरण अधिक पवित्र केले. सकाळी 11 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिमय प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती कार्यक्रमास होती.
मंदिराची वैशिष्ट्ये
नव्याने बांधण्यात येत असलेले हे मंदिर सुमारे 20 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात आणि 7 कोटी रुपये खर्चून हे भव्य मंदिर उभारले जाणार आहे.मंदिर परिसरात वैदिक संस्कृतीचा प्रसार,ध्यान आणि संस्कार केंद्र, युवकांसाठी वैदिक प्रशिक्षण केंद्र, बालसंस्कार केंद्र, तसेच महिलांसाठी प्रोत्साहन केंद्र असणार आहे.अन्नछत्र,गोविंद रेस्टॉरंट आणि भगवान श्रीकृष्णाच्या विविध अवतारांचे आकर्षक चित्रदालन हे या मंदिराचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
भुसावळचा गौरव
मुंबई, पुणे, नाशिक आणि अमरावतीनंतर इस्कॉनचा हा भव्य प्रकल्प आता भुसावळमध्ये साकारत आहे.प्रत्येक शहरात एक लघु वृंदावन निर्माण करणे हा इस्कॉनचा संकल्प या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. भुसावळच्या आध्यात्मिक इतिहासात आजचा दिवस‘भक्तीचा आणि व्यसनमुक्तीचा नवा प्रभात ठरल्याची भावना इस्कॉन परिवारात व्यक्त करण्यात आली. यावेळी इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष रास यात्रा दास यांनी प्रस्तावना केली. यावेळी इस्कॉनचे मोठ्या प्रमाणावर सदस्य उपस्थित होते.


