भुसावळात डंपरवर कंटेनर आदळला : चालक ठार


Container hits dumper in Bhusawal : Driver killed भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील जॉली पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उड्डाणपुलावर निष्काळजीपणे उभ्या केलेल्या डंपरला कंटेनरची जोरदार धडक बसून हा अपघात घडला.

असा घडला अपघात
ट्रक चालक भगवान संभाजी सावंत (वय 62, रा. लहान, ता. अर्धापूर, जि. नांदेड) असे असून, ते ट्रक (टीजी 07 यु 7584) चालवत होते. तेव्हा उड्डाणपुलावर राखेने भरलेला डंपर (एमएच 20 ईजी 3700) रस्त्यावरच निष्काळजीपणे उभा ठेवण्यात आला होता. त्या डंपरच्या मागे कोणतेही दिशा दर्शक फलक किंवा इशारा न लावता चालक वाहन सोडून गेल्याने चालक सावंत यांना तो अंधारात दिसला नाही आणि त्यांनी चालविलेला कंटेनर थेट डंपरवर जाऊन आदळला. या भीषण धडकेत भगवान सावंत गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी फिर्यादी अश्विन कुमार (रा.अर्धापूर, जि. नांदेड, सध्या सुयश सृष्टी, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून डंपर चालक अद्याप पसार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !