भुसावळ पालिका निवडणुकीमुळे वाहनांची तपासणी सुरू : सर्वेक्षण केंद्र सक्रिय


Vehicle inspection begins due to Bhusawal Municipal Elections : Survey Center active भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत रकमांची ने-आण, दारूची अवैध वाहतूक किंवा अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी शहराच्या चारही मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथके नेमली आली असलीतरी ही पथके सक्रिय नव्हती मात्र आता ही पथके सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

या भागात होतेय तपासणी
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार भुसावळ शहरात प्रवेश करणार्‍या चारही प्रमुख मार्गांवर ही केंद्रे तयार असून यावल रोडवरील वनविभाग नाका, जळगाव रोडवरील दुचाकी शोरूमसमोर, जामनेर रोडवरील पेट्रोल पंपजवळ आणि वरणगाव रोडवर पथके तयार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी प्रत्यक्ष केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांना सक्त सूचना केल्यात.

बुधवारपासून रस्त्यावरील ही केंद्रे सुरू झाली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. यावल रोड आणि जळगाव रोडवरील ही केंद्रे कार्यान्वीत झाली, तेथे वाहनांची तपासणी केली जात होती. येथे 12 तासाची ड्युटी लावण्यात आली असून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यत आणि रात्री 8 ते सकाळी 8 पर्यत असे कर्मचारी पथक नियुक्त केले आहे.

आता प्रत्येक ठिकाणी तीन महसूल कर्मचारी व दोन पोलिस कर्मचारी अशा पथकांचा नियमितपणे ड्युटीवर सहभाग आहे. वाहनांची तपासणी, संशयितांची चौकशी आणि माल वाहतूक तपासणी सातत्याने सुरू आहे. काही ठिकाणी दुपारच्या वेळी वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. संबंधित तपशील निवडणूक नियंत्रण कक्षाकडे पाठवला जात आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार या पथकांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !