भुसावळ पालिका निवडणूक : 53 लाखांची थकबाकी वसूल
Bhusawal Municipality Election: Recovery of dues worth Rs 53 lakhs भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीमुळे शहरातील पालिकेच्या थकीत कर वसूलीचे प्रमाण वाढले आहे. येत्या आठवड्याभरात पालिकेची 53 लाख रुपयांची वसूली झाली आहे. विशेष म्हणजे कोणतीही थकीत वसूली मोहिम न राबवता, पालिकेच्या कार्यालयात येवून पालिका निवडणूक लढविणार्या इच्छूकांनी कर भरणा केला आहे. सोमवारी एकाच दिवसांत 10 लाख 57 हजार रुपयांची वसूली झाली.
दाखला अनिवार्य असल्याने थकबाकी वसुल
नगरपालिका निवडणूकीत पालिका प्रशासनाची कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला अनिवार्य आहे. शहरात गेल्या आठ वर्षांपासून निवडणूक झाली नाही, यामुळे अनेक माजी नगरसेवकांकडेही थकबाकी कायम होती. आता निवडणूकीत कराची थकबाकी नसल्याचा दाखला आवश्यक असल्याने इच्छूक तसेच थकीत बाकी असलेले माजी नगरसेवक व पदाधिकारी स्वत: पालिकेत येवून कराच्या रक्कमेचा भरणा करुन थकबाकी नसल्याचा दाखला घेत आहेत. पालिकेने शहरात तीन झोनमध्ये थकीत कर भरणा केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात थकबाकी भरण्याकडे इच्छूक उमेदवारांचा कल आहे. प्रशासनाकडे दररोज 7 ते 9 लाख रुपये थकबाकी वसूल होत आहे. सोमवारी प्रशासनाकडे 10 लाख 57 हजार रुपयांची वसूली झाली. अजून दोन ते तीन दिवस भरणा वाढणार आहे. यामुळे पालिकेची किमान 70 लाखांपर्यंत करवसूली होइल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शौचालयाचा दाखलाही अनिवार्य
पालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराकडे शौचालय असण्याचा दाखलाही आवश्यक आहे. या अनुषंगाने इच्छूकांनी उमेदवारी अर्जासाठी हा दाखला मिळविणेही सुरु केले आहे. उमेदवारांना पडताळणी न करताच दाखला दिला जात आहे.


