भुसावळात माजी नगराध्यक्ष सुनील काळे समर्थकांचे मंत्री सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
फार्म हाऊसवरून उमेदवारी जाहीर होत असल्याचा धक्कादायक आरोप : पक्ष निष्ठेवरही उपस्थित केला सवाल
गणेश वाघ
Former Mayor Sunil Kale and his supporters staged a sit-in protest outside Minister Savkare’s office in Bhusawal. भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : वरणगावचे माजी नगराध्यक्ष व कट्टर भाजपेयी सुनील काळे यांना भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना डावलले जात असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थकांनी गुरुवारी सायंकाळी मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळातील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना काळे यांनी वरणगावसाठी थेट फार्म हाऊसवरून उमेदवार जाहीर झाल्याचा धक्कादायक आरोप करून राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडवून दिली.
मंत्री सावकारे आमचे पालक, त्यांच्याकडूनच न्यायाची अपेक्षा
याप्रसंगी सुनील काळे म्हणाले की, आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात भाजपामधूनच झाली असून अगदी मी मेला तरी माझ्या अंगावर भाजपाच झेंडा असावा ही आपली अखेरची इच्छा असेल. आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी आलेलो नाहीत तर आमची आग्रहाची मागणी केवळ कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याची आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. मंत्री संजय सावकारे आमचे पालक आहेत म्हणून त्यांच्या दारी आम्ही न्याय मागण्यासाठी आलो असून कारण त्यांना आमची जाण आहेत, ते आमचे अश्रू पुसू शकतात, दुसर्या नेत्याकडे आम्ही जावू शकत नाही, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
फार्म हाऊसवर उमेदवारी जाहीर झाल्याचा धक्कादायक आरोप
वरणगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आखाडा तापला असतानाच वरणगाव नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या सुनील काळे यांना डावलून अन्य उमेदवाराला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची कुणकुण लागताच अनेक कट्टर भाजपेयींनी मंत्री सावकारे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करीत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सुनील काळे यांनी वरणगावात नगराध्यक्ष पदासाठी ठरवण्यात आलेला उमेदवार फार्म हाऊसवरून ठरवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले की, संपूर्ण वरणगाव शहरात आता ही चर्चा होत आहे, तसे असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
आम्ही छाती फाडून निष्ठा दाखवावी का?
भाजपाने उमेदवारी डावलल्यानंतर भूमिका काय असेल ? या प्रश्नावर काळे यांनी आम्ही भाजपा कदापि सोडणार नसल्याचे सांगत, आम्ही आमची निष्ठा का छाती फाडून दाखवावी का? असा प्रश्न उपस्थित केला. भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेलेल्यांनी वरणगावात भाजपाचा एक कार्यकर्ता शिल्लक ठेवणार नसल्याचे म्हटले होते मात्र त्याही परिस्थिती आम्ही मार खाल्ला मात्र पक्ष निष्ठा सोडली नाही शिवाय विधानसभा व लोकसभेतही आम्ही पक्ष निष्ठा राखली याची आठवण त्यांनी करून दिली. मंत्री सावकारे निश्चितपणे आमच्या भावनांची दखल घेतील, असेही त्यांनी सांगितले.


