नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक ; जिल्हाधिकारी रोहन घुगे


Candidates in municipal elections must get electronic advertisements authenticated ; District Collector Rohan Ghuge जळगाव (19 नोव्हेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, सावदा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, रावेर, एरंडोल, फैजपूर या 16 नगरपरिषदांच्या मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायतीतिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणार्‍या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी केले आहे.

जिल्ह्यात 18 पालिकांच्या निवडणुका
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 16 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना यानुसार निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीत जिल्हाधिकारी घुगे हे अध्यक्ष आहेत. याशिवाय या समितीत पोलिस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती इमारत पहिला मजला, आकाशवाणी चौक, जळगाव ) यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरात निर्मिती खर्चाचे देयक, जाहिरातीचा पेन ड्राईव्ह / उऊ आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यानी किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती सोबत जोडाव्यात, असेही आवाहन जिल्हाधिकारी घुगे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !