वरणगावात सुनील काळेंची बंडखोरी कायम ! नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार रिंगणात


वरणगाव (21 नोव्हेंबर 2025) : वरणगाव नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे माघारीअंती स्पष्ट झाले आहे. भाजपाने उमेदवारी कापल्याने पक्षावर गंभीर आरोप करून पक्षाची अडचण वाढवणार्‍या माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे षड्डू ठोकत आपली उमेदवारी कायम ठेवल्याने येथे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी येथे जितेंद्र भागवत पाटील, फकीर जावीदशा बाबुशा तर गुरुवारी रुक्मिणी काळे यांनी माघार घेतल्यानंतर नगरपालिकेच्या आखाड्यात आठ उमेदवार रिंगणात आहेत.

तिघांची माघार : आठ उमेदवार रिंगणात
वरणगाव पालिका निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने स्पर्धेत आता आठ उमेदवार आहेत. शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. येथे नगराध्यक्ष पदाची लढत अधिक चुरशीची होणार असून आगामी काळात नेते कशा पद्धत्तीने रणनिती आखून राजकीय गणितांचे डावपेच टाकतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.



दहा जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात
वरणगावात नगरसेवक पदासाठी एकूण 104 उमेदवार रिंगणात असलेतरी गुरुवारी एकाने व शुक्रवारी आणखी 13 उमेदवारांनी माघार घेतल्याने 90 उमेदवार 10 प्रभागांमधून आपले नशीब आजमावत आहेत.

बंडखोर उमेदवाराने वाढवली भाजपाची अडचण
भाजपाने उमेदवारी कापलेल्या सुनील काळे यांनी आपण भाजपेयीच असल्याचे म्हणत निवडणूक आखाडा तापवत नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करीत प्रत्यक्षात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपातील पक्ष श्रेष्ठींवर अनेक गंभीर आरोपही काळे यांनी करीत जनतेचे लक्ष वेधले आहे. काळे यांची बंडखोरी मात्र भाजपासाठी येथे चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.

उद्यापासून रंगणार आखाडा : प्रचार रॅलीसह कॉर्नर बैठकांचे नियोजन
वरणगावात कधी नव्हे तर एव्हढी चुरशीची निवडणूक होईल हे उमेदवारांच्या रणनितीवरून दिसून येत आहे. माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्याने शनिवारपासून खर्‍या अर्थाने निवडणूक आखाडा तापणार आहे तर प्रचार रॅलीसह कॉर्नर बैठकांचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !