भाजपाच्या सर्वेत रजनी सावकारे प्रथम आल्यानेच त्यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट : भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले ; डावोसमधील बैठकीनंतर एक तरी उद्योग भुसावळात आणण्याची ग्वाही !


भुसावळ (24 नोव्हेंबर 2025) : भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण एससी प्रवर्गाचे निघाल्यानंतर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीला तिकीट दिल्याचा आरोप झाला मात्र मुळात मंत्री संजय सावकारे यांनी पत्नीला तिकीट मिळावे म्हणून मागणी केली नाही तर पक्षाने भुसावळात सर्वे केला व त्यात पहिल्या क्रमांकावर रजनी सावकारे यांचे नाव आल्याने त्यांना तिकीट देण्याचा पक्षाचा असून मंत्री संजय सावकारे यांचा संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी येथे स्पष्ट केले.

भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयासमोरील बसस्थानकाच्या नियोजित जागेवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, भुसावळकरांचा पाण्यासाठीचा वनवास संपणार असून वर्षभरात 24 तास पाणी अमृत योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.




यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार राजूमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उद्योजक मनोज बियाणी, डॉ.राध्येश्याम चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, अशोक कांडेलकर, नंदू महाजन, डॉ.केतकी पाटील यांच्यासह भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे 14 उमेदवार उपस्थित होते.

देश व राज्याप्रमाणे पालिकेतही हवे मोदीजींच्या द़ृष्टीचे व्हिजन
मुख्यमंत्री म्हणाले की, शहरे कशी बदलली पाहिजे याची आमच्याकडे ब्लू प्रिंट आहे त्यामुळे सकारात्मक माध्यमातून आम्ही मत मागणार असून विरोधकांवर कुठलीही टीका-टीप्पणी आम्ही करणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू आहे त्यामुळे विकासाची कास धरलेले सरकार केंद्रासह राज्यात पहायला मिळत आहे. आपल्याला त्याच विचारांचे सरकार नगरपालिकेतही आणायचे आहे व मोदीजींच्या दृष्टी व व्हीजनद्वारे आपल्याला काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.

चार वर्षात प्रत्येक शहरात भूमिगत गटारी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरांकडे दुर्लक्ष झाल्याने ती बकाल झाली आहे. या शहरांमध्ये अन्न, वस्त्र व निवार्‍याची, रोजगाराची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शहराच्या विकासासाठी लाखो कोटी रुपयांच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी चार वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात भुयारी गटारी होतील, सांडपाणी रस्त्यावर वा कुठेही दिसणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त करीत योजनांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे रस्ते तयार करीत असल्याचेही सांगितले.

भुसावळकरांना वर्षभरात अमृतचे 24 तास पाणी
भुसावळसाठी मंजूर असलेल्या अमृत योजना टप्पा एकचे काम कंत्राटदार करीत नसल्याने त्यास ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून अमृत टप्पा दोनच्या कामाला गती आली आहे. लवकरच कामे पूर्ण होतील व वर्षभरात भुसावळकरांना 24 तास पाणी मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भुसावळसाठी एक तरी उद्योग आणणार
भुसावळातील एमआयडीसी टेक्सटाईल पार्क आणण्याची मागणी मंत्री संजय सावकारे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाषणातून आश्वास्त करीत पुढील महिन्यात डावोसमध्ये जात असल्याने एक तरी उद्योग भुसावसाठी आणणार असल्याची ग्वाही दिली. दीपनगरात 800 मेगावॅटचा प्रकल्प करायला हवा, अशी मागणी सावकारे यांनी केली असून त्यादृष्टीनेही आम्ही प्रयत्न करू शिवाय मंत्री सावकारे यांच्या प्रत्येक मागण्या पूर्णच केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लाडकी बहिण योजना बंद होणार नाही
सरकारला 23 नोव्हेंबर रोजी येवून एक वर्ष झाले मात्र निवडून आल्यानंतर लाडकी बहिण योजना बंद होईल, अशी भीती घालण्यात आली मात्र जो पर्यंत लाडक्या बहिणींचा हा देवाभाऊ आहे तो पर्यंत योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भुसावळात 147 कोटीतून स्टेशन निर्मिती करण्यात येत असून हे सरकार गरीबांसाठी, महिलांसाठी काम करणारे सरकार असल्याचे ते म्हणाले.तुम्ही भाजपाला साथ द्या, पाच वर्ष आम्ही जवाबदारी घेवू, असेही त्यांनी सांगत महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आल्याचे सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !