365 दिवस नागरिकांच्या संपर्कात राहून रस्ते, पाणी, गटारी, पथदिव्यांची समस्या सोडवणार : राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता डागोर यांची ग्वाही

व्हीजन प्रभागाच्या विकासाचे : संधी मिळाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षांना खरे उतरण्याची उमेदवाराची ग्वाही


भुसावळ (30 नोव्हेंबर 2025) : जनसेवा हीच ईश्वरसेवा मानुन आपण निवडणूक रिंगणात आहोत व केवळ निवडणुकीपुरता मतदारांकडे मत मागण्यासाठी न जाता 365 दिवस नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर राहू तसेच नागरिकांनी संधी दिल्यास प्रभाग नऊमधील रस्ते, पाणी, गटारी, नाल्यांवरील ढापे, गोरगरीबांना घरकुलाचा लाभ, शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आपले प्रयत्न असतील, अशी ग्वाही प्रभाग नऊ ब मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता डागोर यांनी दिली.

प्रभाग क्रमांक 9 ब मधूनच उमेदवारी का ?
उमेदवार : गेल्या अनेक वर्षांपासून आपले पती व समाजसेवक अजय कुमार डागोर याच प्रभागातील रहिवासी असल्याने या प्रभागाशी सामाजिक उपक्रमातून आपली नाळ जुळली आहे. समाजसेवेच्या माध्यमातून विविध उपक्रमाद्वारे नागरिकांशी थेट कनेक्ट असल्याने त्यांच्या अनेक समस्या अद्याप सुटल्या नसल्याचे लक्षात आले. ज्यावेळी प्रभागाचे महिला राखीव आरक्षण निघाले त्यानंतर समाजमनातून माझे नाव पुढे आले. यामुळे मला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. नागरिकांनी संधी दिल्यास नक्कीच शाश्वत विकास करून दाखवू.

प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?
उमेदवार : प्रभाग क्रमांक नऊमधील अनेक भागातील गटारींवरील ढापे तुटले आहेत ते नवीन करण्यासह नवीन गटारी तयार करण्याला प्राधान्य असेल शिवाय रस्ते, पथदिवे, पाण्याची समस्या सोडवण्यास आपले प्राधान्य असेल. प्रभागातील अनेक गरजू महिलांना घरकूल मिळाले नसल्याने ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न असतील शिवाय बेरोजगारांना काम-धंदा मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील. शासनाकडून शिक्षीत तरुणांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते तसेच बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज मिळते व हा लाभ मिळवून देण्यासाठी निश्चितपणे आपले प्रयत्न असतील या माध्यमातून बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल.

पालिका शाळांबाबत नेमके धोरण काय असेल?
उमेदवार : भुसावळ शहरातील पालिका शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शाळांचा दर्जा व स्थिती सुधारण्यासंदर्भात निश्चितपणे आपण संधी मिळाल्यानंतर सभागृहात पाठपुरावा करू.

पर्यावरण संवर्धनाबाबत काय नियोजन आहे?
उमेदवार : भुसावळात महिलांच्या संस्था उपक्रमशील आहेत. या संस्थांना नगरपालिकेने प्रोत्साहन दिले तर या संस्थाच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरण, जनजागृती करता येईल. शहरात आगामी काळात व्यापक प्रमाणात पर्यावरण संवर्धनाची कामे करण्याचे नियोजन आहे. प्लास्टीक कॅरीबॅगला चांगला कमी खर्चातील पर्याय दिला तर कचर्‍याची समस्या कमी होईल. व्यापक वृक्षारोपण झाल्यास उन्हाळ्यातील तापमानात किमान दोन ते तीन अंशांनी घट होऊ शकेल.

ज्येष्ठांसह नागरिकांसाठी भूमिका काय असेल?
उमेदवार : प्रभागातील ज्येष्ठांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी खरे तर उद्यानाची आवश्यकता आहे. प्रभागात पालिकेची ओपन स्पेस उपलब्ध असल्यास या जागेवर उद्यान उभारणीसाठी पाठपुरावा करता येईल शिवाय ज्येष्ठांसाठी लायब्ररी कट्टा तसेच ठिकठिकाणी बाकडे बसवून ज्येष्ठांची सोय करता येईल.

महिलांबात काय असेल भूमिका ?
उमेदवार : मी स्वतः महिला असल्याने महिलांच्या समस्या आपल्याला चांगल्या पद्धत्तीने ठावूक आहेत. महिलांसाठी प्रभागात स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यावर आपला भर असेल शिवाय महिला आत्मनिर्भर होण्यासाठी बचत गटांची स्थापना करून त्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देवून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करता येईल तसेच महिलांना प्रभागात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !